चौथ्या दिवशी ‘महावीर गाथा’ ऐकताना उपस्थित भाविक मंत्रमुग्ध
महाराष्ट्र जैन वार्ता. : अभिजित डुंगरवाल
पुणे : महावीर बनण्यासाठी एक जन्म पुरेसा नाही. एका जन्मात ते भगवान महावीर बनलेले नाहीत. त्यासाठी त्यांनी २७ जन्मांची यात्रा केलेली आहे. चारही गतींचे अनुभव महावीरांनी घेतले आहेत. सगळ्या प्रकारच्या अनुभवांच्या आगीतून ते गेलेले आहेत आणि त्यातून पुढे महावीर बनलेले आहेत म्हणून त्यांचे जीवन सर्वांत वेगळे आहे, असे गौरवोद्गार घोर तपस्वी प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी काढले.
गोयल गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महावीरगाथा’ या प्रवचनमालेचे चौथे पुष्प त्यांनी गुंफले. चौथ्या दिवशी विश्वभूतीची कथा त्यांनी उलगडली. उपस्थित श्रोत्यांना जीवनाचा अनोखा संदेश त्यांनी दिला. आजच्या जीवनातील अनुभवाशी जोडत अनेकानेक चांगल्या गोष्टी सांगितल्या. प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, तथाकथित संतांची संख्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांपेक्षा अधिक असते.
कुंभमेळ्यात फक्त वैदिक संस्कृतीचे संत जमतात त्यांची इतकी मोठी संख्या होते. सगळ्या धर्माचे संत एकत्र आले तर किती मोठी संख्या होऊ शकेल. अर्थात खऱ्या मार्गावरून चालणारे किती हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. जो घर सोडतो त्याला संन्यासी म्हणतात आणि प्रभूच्या मार्गावर चालणाऱ्यांना संत म्हणतात. लग्न अनेकांचे होते परंतु राम-सीता बनून जगणारे किती हे महत्त्वाचे आहे.
जिथे आपण आपल्या माणसाशी थेट बोलू शकतो तिथे प्रेम, आस्था यांचे नाते असते परंतु जिथे आडून आडून बोलले जाते त्याला राजकारण म्हटले जाते. जेव्हा षडयंत्र रचली जातात तेव्हा महाभारताचे राजकारण सुरू होते. महामंत्र्याने विश्वभूतीला बाहेर घालवण्यासाठी असेच एक षडयंत्र रचले. अचानक गुप्तहेर राजसभेत राजासमोर आले.
त्यांनी सांगितले की राज्याच्या शेजारील सामंताने विद्रोह केला आहे, त्यावर नियंत्रण मिळवले नाही तर इतर सामंतांना सोबत घेऊन तो राजधानीवर आक्रमण करेल अशी माहिती दिली. त्यामुळे युद्धाची तयारी करण्यात आली. परंतु हे सारे विश्वभूतीला बाहेर काढण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे याची राजाला कल्पनाच नव्हती. राजाने इकडे युद्धाची घोषणा केली.
रणदुदुंभी वाजताना ऐकून योद्धा असलेला विश्वभूती तडक सभेत पोहोचला. माणसाच्या आस्थेला जेव्हा फटका बसतो तेव्हा तो फक्त शरीराने जिवंत राहतो परंतु मनाने मरून जातो. विश्वासाला तडा गेल्यावर माणूस खचून जातो. राजसभेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेले होते. पण विश्वभूतीकडे कुणी पाहिलेही नाही.
तो राजाकडे गेला आणि म्हणाला, तात, मी असताना तुम्ही युद्धावर जाणार? हे नाही होऊ शकत. कुठे युद्ध करायचे आहे?… प्रश्न राजाला होता पण उत्तर मंत्र्याने दिले. तो म्हणाला, राज्याशी तुला काय घेणे देणे आहे. तु राण्यांसमवेत आनंद घेत बस. विश्वभूती पुन्हा राजाला म्हणाला, मी असताना आपण युद्धभूमीवर जाणार नाही.
पण मी जाईन युद्धभूमीवर. कुणाशी लढायचे आहे, का लढायचे आहे मला माहित नाही पण या लढाईचे नेतृत्व मी करेन. विश्वभूतीचा हा स्वभाव षडयंत्र करणारे ओळखून होते. चांगल्या लोकांच्या चांगल्या स्वभावाचा उपयोग वाईट लोक हुशारीने करतात. अनेकदा सज्जन व्यक्तीला त्याच्या सज्जन स्वभावाचीच शिक्षा मिळते.
पुन्हा मंत्री उपहासाने म्हणाला, आधी तुझ्या राणीला विचारून तर ये. हे ऐकून विश्वभूती खूप चिडला. तो म्हणाला, मी त्यांचा गुलाम नाही. मी इथूनच युद्धाकडे कूच करतो आहे. मंत्र्यांना हेच तर हवे होते.
राजाने विश्वभूतीकडे पाहिले. त्याच्या मनात आले की आपला मुलगा असा असायला हवा होता.
रणदुदुंभी ऐकून त्याचा मुलगा विशाखनंदी आला नाही परंतु विश्वभूती मात्र धावून आला होता आणि युद्धावर जाण्यासाठी क्षणार्धात सज्ज झालेला होता. विश्वभूतीला राज्यातून बाहेर काढण्याचे हे षडयंत्र आहे हे राजालाही माहित नव्हते. त्यामुळे त्याने स्वतः मिठी मारून विश्वभूतीला निरोप दिला. विशाखनंदन व त्याच्या राण्यांनी मिळून इकडे विश्वभूतीच्या राण्यांना बाहेर काढले.
मंगलतिलकसुद्धा न घेता विश्वभूती युद्धावर गेला याचे राण्यांनाही आश्चर्य वाटले. राण्यांना त्यानंतर अपमान सहन करावे लागले. एकीकडे पती युद्धावर न सांगता गेल्याचे दुःख आणि दुसरीकडे होणारा अवमान अशा अवस्थेत राण्या सापडल्या होत्या.
विश्वभूतीच्या आईला जेव्हा समजले तेव्हा आपल्या मुलाच्या बाबतीत षडयंत्र केले जाते आहे अशी शंका तिला आली. युद्धभूमीवर जाण्यापूर्वी जर आपल्या आईवडिलांना भेटायला विश्वभूती गेला तर हे षडयंत्र नाकाम होईल हे मंत्री जाणून होता. म्हणूनच आपणसुद्धा जगताना कितीही मोठी आणीबाणी आली तरी तुम्ही ज्यांच्यावर श्रद्धा ठेवता त्यांना सांगितल्याशिवाय पाऊल उचलू नका.
जीवनात अशी विश्वभूतीसारखी परिस्थिती जेव्हा केव्हा निर्माण होईल तेव्हा आपल्या श्रद्धेय व्यक्तीला प्रणाम केल्याशिवाय जाण्याचा निर्णय घेऊ नका. उद्यानात रमलेल्या विश्वभूतीला केवळ बाहेर काढायचे या छोट्या कामासाठी आस्था आणि विश्वास पूर्णपणे तुटेल असे षडयंत्र रचले गेले.
इकडे चिडलेला विश्वभूती सामंतांकडे गेला आणि त्यांना खडसावले. तेव्हा त्यांनी कुठलेही बंड केले नसल्याचे त्याच्या लक्षात आले. विश्वभूतीला भेटायला आलेल्या वृद्ध दूताने त्याला सांगितले की, बंड झाले असे तुला जिथे सांगितले तिथेच खरे बंड झालेले आहे. तू योद्धा आहेस पण राजकारणातील कपट तू जाणत नाहीस.
उद्यानातून तुला बाहेर काढण्यासाठी हे सगळे षडयंत्र रचले गेले. जेव्हा नगरीत परत आलेल्या विश्वभूतीला सगळे समजले तेव्हा त्याला खूप राग आला परंतु तो विश्वभूती नगरीतून निघाला. भगवान महावीरांनी आपल्या श्रावकांना एक संदेश दिला होता. तो म्हणजे कुटुंबाला जागरुक ठेवण्याचा.
आपण आपल्या कुटुंबाला जागरुक ठेवतो का प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. घर तीर्थ बिना सब व्यर्थ और अनर्थ है हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे असे प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी स्पष्ट केले.