पाच ठिकाणी हाईट बॅरिअर बसविणार : रॅम्बलर व गतीरोधक बसविणार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गंगाधाम चौकात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दिपाली सोनी यांचा मृत्यू झाल्यानंतर शहर पोलीस दलाने या परिसरातील वाहतूक नियोजनाबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार मार्केटयार्ड वाहतूक विभागाच्या अंतर्गत कान्हा हॉटेल ते गंगाधाम चौक, टिळेकर नगर ते गंगाधाम चौक दरम्यानच्या रस्त्यांवर ट्रक, मिक्सर, डंपर, कंटेनर व इतर सर्व जड / अवजड वाहनांना वाहतुकीसाठी ये-जा करण्यास २४ तास प्रवेश बंद करण्यात आला आहे.
लुल्लानगर चौक – गंगाधाम चौक – चंद्रलोक हॉस्पिटल चौक व गंगाधाम चौक – वखार महामंडळ चौक – सेव्हन लव्हज चौक या मार्गांवर ट्रक, मिक्सर, डंपर, कंटेनर व इतर सर्व जड / अवजड वाहनांना वाहतुकीसाठी ये-जा करण्यास सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत प्रवेश मनाई करण्यात आली आहे.
या ठिकाणी २४ तास वाहतूक अंमलदार नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या रस्त्यावर तीव्र उतार असल्याने जड वाहनांमुळे अपघात होत असून, या रस्त्यावर १) कान्हा हॉटेल २) पासलकर चौक ३) भवानी माता मंदिर ४) आई माता मंदिर ५) वाय जंक्शन ६) गंगाधाम बसस्टॉप येथे आयआरसी नियमांनुसार हाईट बॅरिअर बसवावेत, जेणेकरून जड वाहनांना प्रवेश रोखता येईल.
तसेच, आई माता मंदिर येथील जीर्ण झालेला रॅम्बलर आयआरसी नियमांनुसार उच्च दर्जाचा रॅम्बलर व गतीरोधक बसविण्याबाबत महापालिकेच्या मुख्य अभियंत्यांना कळविण्यात आले आहे.
मार्केटयार्ड परिसरात निर्बंध असलेल्या जड वाहनांवर १४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ३ कारवाया करण्यात आल्या आहेत.
रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर १३ खटले दाखल करण्यात आले आहेत. शहरात नियमभंग करणाऱ्या जड वाहनांवर गेल्या काही दिवसांत विविध पोलीस ठाण्यांत ३६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जानेवारी २०२५ ते आतापर्यंत ३२,२५६ जड वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून दंड म्हणून ४५,६२,३०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. वाईन्स व परमिट रूम चालवणाऱ्यांना ३ नोटिसा देण्यात आल्या आहेत.
तसेच, २ परमिट रूमचे परवाने रद्द करून त्यांचे स्थलांतर करण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मोठे फ्लेक्स काढण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे.
अन्न व औषध प्रशासनास मार्केटयार्डमधील आस्थापनांची पाहणी करून कार्यवाही करण्याबाबत वाहतूक विभागाने पत्र दिले आहे. गंगाधाम चौकात तसेच परिसरात पेट्रोलिंग व जनजागृती करण्यात येत असल्याचे वाहतूक विभागाने कळवले आहे.
गेल्या आठवड्यात भरदिवसा गंगाधाम चौकात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दिपाली सोनी यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली आणि नागरिकांशी चर्चा केली. त्यानंतर वाहतूक शाखेकडून अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.
