आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हैदराबादच्या कंपनीने ३६ गुंतवणूकदारांची ८ कोटी ५४ लाखांची फसवणूक केली

Spread the love

पुणे : मासिक ११ ते २२ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत, कायदेशीर इनव्हॉइस डिस्काऊंटिंग प्लॅटफॉर्मच्या नावाखाली हैदराबादस्थित कंपनीने पुण्यातील ३६ गुंतवणूकदारांची तब्बल ८ कोटी ५४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या फसवणुकीत डॉक्टर, आयटी अभियंते आणि व्यावसायिकांचा समावेश आहे.

मार्केटयार्ड येथील एका डॉक्टरांनी याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी फाल्कन ग्रुप व कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिता कुमारी, संदीप कुमार आणि अन्य अधिकाऱ्यांविरोधात महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय हितसंरक्षण अधिनियम (MPID कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२२ पासून सुरू असून आजतागायत चालू आहे.

गुंतवणूकदार प्रामुख्याने कल्याणीनगर, रहाटणी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, वाघोली, मांजरी, हडपसर, पाषाण आणि टिंगरेनगर या परिसरातील उच्चशिक्षित नागरिक आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टरांना फाल्कन ग्रुप आणि कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स या कंपन्यांची माहिती नातेवाईकांकडून मिळाली होती.

या कंपनीकडून ब्ल्यू चिप कंपन्यांच्या पुरवठादारांना (व्हेंडर्स) इनव्हॉइस डिस्काउंटिंगसाठी निधी पुरवण्यात येतो, असा दावा करण्यात आला होता. त्या मोबदल्यात गुंतवणूकदारांना निश्चित परतावा दिला जातो, अशी माहिती कंपनीच्या संकेतस्थळावरही देण्यात आली होती.

त्या आधारे फिर्यादी डॉक्टरांनी ११ लाख रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीला काही महिन्यांपर्यंत ठरल्याप्रमाणे परतावा मिळत होता. मात्र नंतर परतावा बंद झाला. कंपनीकडून “तीन महिन्यांत मूळ रक्कम परत केली जाईल” असे आश्वासन देण्यात आले, पण प्रत्यक्षात पैसे परत मिळाले नाहीत.

यानंतर संबंधित डॉक्टरांनी हैदराबादमधील कंपनीच्या कार्यालयात भेट दिली असता, ते कार्यालय बंद आढळले. तपासादरम्यान, या कंपनीविरोधात हैदराबादच्या सायराबाद आर्थिक गुन्हे शाखेतही गुन्हा दाखल झाल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकाराची माहिती पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिल्यानंतर तपासादरम्यान आणखी ३५ गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. एकूण फसवणुकीची रक्कम ८ कोटी ५४ लाख रुपये इतकी आहे.