कवी अशोक नायगावकर यांनी जिंकली मने
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांचा मिस्किली आणि कविता हा बहारदार कार्यक्रम मायबोली सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. रसिकांच्या अलोट गर्दीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात नायगावकरांनी सादर केलेल्या कवितांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
त्यांच्या मिस्किल आणि खुसखुशीत निवेदनामुळे कार्यक्रमात विशेष रंगत आली. लोकमान्य टिळक, मुळाक्षरांची कविता, उजवे आणि डावे, स्वयंपाक घरातील हिंसाचार या सर्वच कविताना उत्तम दाद मिळाली.
कार्यक्रमाचा प्रारंभ संत ज्ञानेश्वर आणि मायबोलीचे संस्थापक अध्यक्ष स्व.विजयकुमार माढेकर यांच्या प्रतिमांसमोर दीप प्रज्वलन करून झाला. त्यानंतर मातृदिनाचे औचित्य साधून विजयकुमार माढेकर यांच्या सहधर्मचारिणी शुक्ला माढेकर यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
त्यानंतर मुकुंदराज कुलकर्णी यांनी लिहिलेल्या, अबोली सुलाखे यांनी स्वरबद्ध केलेल्या मायबोलीच्या गौरव गीताचे गायन महेश पाटील व सहकाऱ्यांनी केले. त्यानंतर सर्व नूतन पदाधिकारी व मायबोलीचे कार्यकारणी सदस्य यांचाही सन्मान पाहुण्यांच्या हस्ते झाला.
नॅचरल शुगरचे अधिकारी श्रीपाद ठोंबरे, मंडळाचे कायदेशीर सल्लागार ऋषिकेश कुलकर्णी, अबोली सुलाखे, स्वराली सुलाखे,वादक कलाकार यांच्या सत्कारानंतर नूतन अध्यक्ष मुकुंदराज कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी संस्थापक स्व. विजयकुमार माढेकर यांच्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला व मायबोली हे त्यांचे चालते बोलते स्मारक असल्याचे सांगितले.
सचिव डॉ. प्रशांत मोहीरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आभार कोषाध्यक्ष व्यंकटेश कुलकर्णी यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत मोहीरे आणि सहसचिव निलेश माढेकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष जवाहर माढेकर, माजी अध्यक्ष अरुण शहा, सहकोषाध्यक्ष राजेंद्र श्रीश्रीमाळ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जितेंद्र माढेकर, सुनील आबा पाटील, पल्लवी माढेकर, अमिता कुलकर्णी, शिल्पा माढेकर, वैशाली मोहीरे यांनी परिश्रम घेतले.