महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : येथील कवी कालिदास मंडळाच्या वतीने कालिदास महोत्सवाचे औचित्य साधून कवीच्या पहिल्या संग्रहास ‘मेघदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या मेघदूत पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी केले आहे.
गेली 31 वर्ष कवी कालिदास मंडळ साहित्याच्या क्षेत्रामध्ये कार्य करीत आहे.नवोदित कवींना प्रोत्साहन मिळावे या हेतूने मंडळाच्या वतीने दरवर्षी नवोदित कवीच्या पहिल्या काव्यसंग्रहास मेघदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
त्यानुसार जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहास या वर्षी जुलै मध्ये संपन्न होणाऱ्या कालिदास महोत्सवामध्ये ‘मेघदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्राप्त झालेल्या संग्रहातून दोन संग्रहांची निवड या पुरस्कारासाठी केली जाणार आहे.
हे मेघदूत पुरस्कार साहित्यिक पं. ना. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ कवी मुकुंदराज कुलकर्णी यांच्यावतीने व ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश गव्हाणे यांच्या वतीने देण्यात येणार आहेत.
रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून कवींनी दिनांक २० जून २०२४ पर्यंत काव्यसंग्रहाच्या तीन प्रती स्वतःचे छायाचित्र व अल्पपरिचय यासह प्रकाश गव्हाणे, ईश्वरी अभ्यासिका, पाटील प्लॉट, शिवाजी नगर, बार्शी ता. बार्शी जिल्हा सोलापूर पिन ४१३४११ (मो. ९७६३ ४६ ६८ ३०) येथे पाठवाव्यात.
यावेळी दत्ता गोसावी, प्रा अशोक वाघमारे, सुमन चंद्रशेखर, डॉ कृष्णा मस्तुद, जयसिंग राजपूत, चन्नबसवेश्वर ढवण, आबासाहेब घावटे, डॉ रविराज फुरडे, शिवानंद चंद्रशेखर, गंगाधर अहिरे आदी उपस्थित होते.