महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भुम : केंद्रीय लोकसेवा आयोगा (युपीएससी) तर्फे घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अक्षय बावस्कर याने यश मिळवले आहे. त्याची दिल्ली येथे औषध नियंत्रण विभागात, औषध निरीक्षक पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे.
दिव्यांग प्रवर्गातून प्रवेश मिळविलेल्या अक्षय बावस्कर यांनी जेमतेम आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करीत २०१७ ते २०२१ या शैक्षणिक कालावधीत डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात बी. फार्मसी चे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर अंतिम वर्षामध्ये महाविद्यालयामधील प्रा. पवनकुमार वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करीत “नाईपर” या देशपातळीवरील नामांकित संस्थेसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये दिव्यांग प्रवर्गातून देशात प्रथम क्रमांक पटकावला होता.
पुढे अक्षयने नाईपर (अहमदाबाद) येथे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले व भुवनेश्वर येथील ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे फार्मसिस्ट ग्रेड २ या पदावर सेवा दिली. फार्मासिस्ट म्हणून कार्यरत असताना त्याने यूपीएससी चा अभ्यास करीत हे नेत्रदीपक यश प्राप्त केले.
आपल्या यशामध्ये डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामधील पदवी शिक्षणा दरम्यान मिळालेल्या ज्ञानाचा मोलाचा वाटा आहे असे त्याने नमूद केले. अक्षय बावस्कर च्या या यशासाठी महाविद्यालय व प्रतिष्ठान तर्फे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी त्याचे अभिनंदन केले.
