बीजेएसच्या उपक्रमाचे कौतुक: पशु मालक, शेतकर्यांशी साधला संवाद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांची पाहणी केली. त्यांनी वाल्हे येथील भारतीय जैन संघटनेने उभारलेल्या चारा छावणीस भेट देऊन जनावरांची पाहणी केली. पशु मालक व शेतकरी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच बीजेएसच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत भारतीय जैन संघटनेने (बी. जे. एस.) संस्थापक शांतिलाल मुथ्था यांच्या मार्गदर्शनात वाल्हे (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे दि. १५ मे पासून ५०० जनावरांच्या क्षमतेची चारा छावणी उभारली आहे. शेतकर्यांच्या अडचणी सोडवण्यास कटिबद्ध असल्याचेही यावेळी शरद पवार यांनी सांगितले.
या प्रसंगी माणिकराव झेंडे, संभाजीराव झेंडे, सुदाम इंगळे, बीजेएसचे रमेश नवलाखा, अशोक पवार आदी मान्यवर तसेच पशु मालक, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चारा छावणीमुळे परिसरातील जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न मिटला असून पशु मालकांना दिलासा मिळाला आहे. शेतकर्यांच्या मागणीनुसार ३० जून पर्यंत चारा छावणी सुरू राहणार आहे.
