शाळेचा पहिला दिवस केवळ औपचारिक परिचय नव्हे, तर आनंदमय सोहळा : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : शिक्षकांनी औक्षण, पाद्यपूजन करत विद्यार्थ्यांच्या गळ्यात मोत्यांच्या माळा घालत केलेल्या हृदयस्पर्शी स्वागताने बावधन येथील सूर्यदत्त नॅशनल स्कुलमधील विद्यार्थी भारावून गेले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. पारंपारिक स्वागताची सुरुवात शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी नम्रतेने, आदराच्या भावनेने विद्यार्थ्यांचे पाय धुऊन केली. या कृतीने मुलांना पवित्रता व निरागसतेचे स्वरूप कृतीतून दिसून आले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्याध्यापिका शीला ओक यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पाद्यपूजन, कपाळावर टिळा लावून विद्यार्थ्यांचे आवारात स्वागत केले.
भारतीय संस्कृतीमध्ये हा क्षण शुभ प्रसंग, आशीर्वाद, समृद्धी व कल्याण याचे दर्शन घडवतो. यातून विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संस्कृती, परंपरा याविषयी जाणीव होण्यासह आपुलकीची व सुसंवादाची भावना निर्माण होते. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “शाळेतील पहिला दिवस म्हणजे केवळ औपचारिक परिचय नाही; तर आनंद सोहळा आहे.
शैक्षणिक प्रवासाचे संगोपन आणि समृद्ध करण्याची सुरवात आहे. सांस्कृतिक परंपरा स्वीकारून, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक आरोग्याचे मौल्यवान धडे देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा स्वागत सोहळा महत्वपूर्ण ठरतो. यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासह आदर, जबाबदारी आणि लवचिकतेची भावना मिळते.”
यावेळी विद्यार्थ्यांना पाण्याची टंचाईची समस्या, पाणी बचतीचे महत्त्व याविषयी पटवून देण्यात आले. संवादात्मक सत्रे आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात पाणी वाचवण्याच्या सोप्या; परंतु प्रभावी मार्गांबद्दल सांगण्यात आले.
पावसाळा सुरू झाल्याने डेंग्यू, मलेरिया आणि पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी काळजी कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन करण्यात आले. पावसाळ्यात घ्यायचे प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छता पद्धतींबद्दल माहिती देण्यात आली.