प्रवीण मसालेवाले ट्रस्ट व रोटरी पूना डाऊनटाऊनचा उपक्रम
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : दिव्यांग व्यक्तींना रोजगारक्षम करण्याच्या उद्देशाने पुण्यातील प्रवीण मसालेवाले ट्रस्ट आणि रोटरी पूना डाऊनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने ९१ दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकल दुकानाचे वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रवीण मसालेवालेचे संस्थापक स्व. हुकमीचंद चोरडिया (भाऊ) यांच्या स्मृती प्रित्यर्थ हडपसर औद्योगिक वसाहत येथील एमसीसीआयएच्या सभागृहात सदर कार्यक्रम झाला. यावेळी प्रवीण मसालेवालेचे कार्यकारी विश्वस्त राजकुमार चोरडिया, मधुबाला चोरडिया, विशाल चोरडिया, आनंद चोरडिया व अन्य पाहुण्यांच्या हस्ते १५ तीन चाकी सायकल दुकानाचे वाटप करण्यात आले.
प्रवीण मसालेवाले समूहाचे संचालक विशाल व आनंद चोरडिया, रोटरी पूना डाऊनटाऊनच्या अध्यक्षा अरुणा राठी, तसेच शब्बीर जामनगरवाला, आदी मान्यवर यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते. या उपक्रमासंदर्भात बोलताना राजकुमार चोरडिया म्हणाले, “प्रवीण मसालेवालेचे संस्थापक स्व हुकमीचंद चोरडिया (भाऊ ) यांचे समाजसेवेचे ध्येय, त्यांनी आम्हाला दिलेली शिकवण व मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचवीत म्हणून आम्ही अनेक सामाजिक कामे हाती घेत असतो.
याद्वारे राज्यातील अनेक शहरी व ग्रामीण भागात आम्ही कार्यरत आहोत. मात्र, दिव्यांगांसाठी भरीव कार्य करावे, या इच्छेने आम्ही रोटरी पूना डाऊनटाऊनच्या सहकार्याने दिव्यांग व्यक्तींना या तीन चाकी सायकल दुकानाचे वाटप करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.
दिव्यांग व्यक्तींना आपला उदारनिर्वाह करण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने आम्ही वर्षभरात ९१ दिव्यांगांना हे सायकल दुकान देत असून याद्वारे त्यांना आत्मनिर्भर करत आहोत. त्यामुळे त्यांचे आयुष्य सुकर होईल असा आमचा विश्वास आहे. या प्रकल्पासाठी उत्कर्ष या संस्थेची आम्हाला खूप मदत झाली.”
या प्रकल्पा अंतर्गत आम्ही विविध भागातील दिव्यांग व्यक्तींना सायकल दुकानाचे वाटप करीत आहोत. या व्यक्तींना नजीकच्या काळात आवश्यक भांडवल, आणि इतर सहकार्य देऊन त्यांचे पालकत्व घेत आहोत. अशी माहिती राजकुमार चोरडिया यांनी दिली.
माझे आजोबा स्व. हुकमीचंद चोरडिया (भाऊ) यांना त्यांच्या व्यावसायिक प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात सायकलची खूप मदत झाली त्यामुळे आज त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाचे औचित्य साधत होत असलेला हा कार्यक्रम माझ्यासाठी खास आहे.
या सायकल दुकान वाटप प्रकल्पाद्वारे त्यांचेच आशीर्वाद आणि शुभेच्छा या सर्व दिव्यांग बांधवांना मिळत आहेत, असे मला वाटते. माझ्या आजोबांचे आशीर्वादाने हे सर्व यशस्वी होतील असे मला हा माझा अनुभवावरुन वाटते, असे सांगत विशाल चोरडिया यांनी आजोबांना आदरांजली वाहिली.
उत्कर्ष अपंग संस्थेच्या सविता मोरे म्हणाल्या, अनेक दिव्यांग व्यक्तींची काम करण्याची आणि स्वत:च्या हिंमतीवर काहीतरी करून दाखविण्याची प्रामाणिक इच्छा असते मात्र, त्यांना अनेकदा मदत मिळत नाही.
प्रवीण मसालेवाले ट्रस्ट आणि रोटरी पूना डाऊनटाऊन यांद्वारे होत असलेले हे सायकल दुकान वाटप यामध्ये भरीव मदत करणारे ठरेल. यावेळी विशाल चोरडिया यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
अरुणा राठी यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रदीप मुनोत यांनी रोटरीच्या उपक्रमांविषयी उपस्थितांना माहिती दिली. जितूभाई मेहता यांनी स्व हुकमीचंद चोरडिया (भाऊ) यांच्या विषयीच्या आठवणी जागविल्या शब्बीर जामनगरवाला यांनी आभारप्रदर्शन केले.