महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पिंपरी चिंचवड येथे वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून 5 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 9 गुन्हे उघडकीस आले आहेत.
दिपक भगवान जाधव (वय-26 रा. कुशल सोनाली सोसायटी समोर, चाकण मुळ रा. मु.पो. पाथरी ता.जि. जळगाव), सचिन साहेबराव पगार (वय-31 रा. संतोषी माता नगर, एमआयडीसी सातपुर, नाशिक) असे अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.पिंपरी चिंचवड शहरात चैन चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखेकडील पथक व युनिट यांना चैन चोरी गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दरोडा विरोधी पथकाने अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले.
सीसीटीव्ही तपासत असताना पोलीस हवालदार अशिष बनकर यांना मिळालेल्या माहितीनुसार व राहुल खारगे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरुन आरोपी शहरात वावरत असल्याची माहिती मिळाली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पेट्रोलींग करत असताना निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन संशयित हे होंडा शाईन (एमएच 12 एनजी 5308) ह्या गाडीवरून जाताना दिसले.
त्यांना ताब्यात घेऊन गाडीबाबत चौकशी केली असता दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी हिंजवडी, देहुरोड, भोसरी, पिंपरी, खडकी, हडपसर परिसरात चोरी केल्याची कबुली दिली. दोघांकडून सोनसाखळी येथील चोरीचे सात तर वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणून 5 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींकडून हिंजवडी, पिंपरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन, एमआयडीसी भोसरी, देहुरोड, भोसरी, खडकी, हडपसर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त गुन्हे विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त -1 बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, औदुंबर रोंगे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, आशिष बनकर, राहुल खारगे, नितीन लोखंडे, प्रवीण माने, प्रवीण कांबळे, सागर शेडगे, गणेश कोकणे, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, अमर कदम, समीर रासकर, चिंतामण सुपे, सुरेश जायभाय, सुखदेव गावंडे, नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली.

 
			

















