प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत : ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांकडून वारकरी शिल्पांची स्वच्छता
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पंढरीची वारी आणि महाराष्ट्रातील लोकांचे एक अतूट नाते आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने या विठ्ठलभक्तांची सेवा करतो. याचाच भाग म्हणून सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांकडून बावधन परिसरातील वारकरी शिल्पांची स्वच्छता करण्यात आली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. ज्ञानोबा-तुकाराम, माउली-माउलीचा जयघोष आणि विठूनामाचा जागर याने पुण्यनगरी भारावून गेली होती.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या वारकरी शिल्प स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले.
सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या संचालक शीला ओक यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांसह शिक्षकही या उपक्रमात सहभागी झाले. रस्त्यातील कचरा उचलत स्वच्छता केली. वृक्षारोपण करून परतणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या कृतीचे कौतुक केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “पंढरपूरला विठुरायाच्या भेटीला निघालेला हा वारकऱ्यांचा एक मोठा परिवार आहे. वारकरी परंपरेत स्वयंशिस्त, नैतिक जीवन आणि अध्यात्मिक सत्याचा शोध दिसतो.
नेहमीच्या अध्यात्मिक संकल्पनेपलीकडील अद्भुत दर्शन घडवणारी ही वारी आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे जतन आणि ७०० वर्षे जुन्या वारकरी संप्रदायाचा सामाजिक संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, असा उद्देश यामागे होता. विद्यार्थ्यांनी स्वच्छता, नैतिक वर्तन आणि कर्तव्यदक्षय जीवन याविषयी घोषणा देत पांडुरंगाचे भजन करीत वारीचा अनुभव घेतला.”
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलाखा यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करत वारकऱ्यांनी आपल्याला दिलेली सुसंवादी अस्तित्वाची, सहिष्णुता आणि शांततेची मूल्ये आत्मसात करायला हवीत, असे नमूद केले. यापुढील काळातही विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत योगदान देणारे सामाजिक उपक्रम ‘सूर्यदत्त’च्या वतीने आयोजित केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.















