मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : मुस्लिम धर्मातील उर्वरीत सर्व जातींना ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, मुस्लिम धर्मातील काही जातींना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आहे. काही जातींना अद्याप आरक्षण नाही. आरक्षण नसल्याने त्या जातीमधील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
आरक्षण सवलत मिळत नसल्याने मुस्लिम धर्मातील मुले शिक्षणाऐवजी खाजगी व्यवसायाकडे तसेच रोजंदारीच्या कामाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची झालेली आहे.
तसेच त्यांना राजकीय लाभही मिळत नाहीत. मुस्लिम धर्मातील खाटीक, बागवान, शिकलगार, नदाफ, पिंजारी, अत्तार, पटवेगार, मणेर, सुतार, मुल्ला, बालबंद, बालबेगी, छप्परबंद, मेहत्तर, मोची, मदारी यांच्यासह अनेक जातींना आरक्षण आहे. मात्र जमादार, सय्यद, पठाण, मोगल, शेख या आडनावांच्या मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही.
त्यामुळे या जातीतील मुस्लिम मुले शिक्षणाचा रस्ता सोडून कुटुंबाच्या रोजीरोटीसाठी मिळेल ते काम करतात. जे काही शिक्षण घेतात त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत असे नमूद केले आहे.
यावेळी अख्तर जमादार, साद शेख, आफताब जमादार, सुलेमान पठाण, इम्रान शेख, आमन शिकलकर, आदिल पठाण, दानिश शेख, आबेद सय्यद, आबेद पठाण आदी उपस्थित होते.















