वाहतूक शिस्तीचे धडे : बार्शीत वाहतूक पोलीस प्रमुखांचा कठोर कारवाईचा इशारा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आता पोलिसांनी खासगी शिकवणी देणाऱ्या क्लासेसना नोटीसा देण्याचे सत्र सुरु केले आहे. क्लासमध्ये दुचाकी वरून येणाऱ्या विद्यार्थांना क्लास मार्फत शिस्तीचे धडे देण्याचा पोलिसांचा हा प्रयत्न दिसत आहे.
वाहतुकीला शिस्त ना लागल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, वाहतूक प्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धन्नापा शेटे यांनी दिला आहे.
शहरातील अल्पवयीन वाहनचालकांची वाढती संख्या, दैनंदिन अपघांतात होत असलेली वाढ, नाहक बळी जाणारे जीव यामुळे बार्शी शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
त्यामुळेपोलिसांनी या सर्व बाबींचा विचार करून व शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी या दृष्टीने शहरातील खासगी शिकवणी वर्गचालक, संचालक यांना शहर वाहतूक पोलिसांकडून लेखी पत्र काढून कायदेविषयक समज देण्यात आली आहे.
कायदेविषयक कठोर नियम खासगी शिक वणीसाठी आलेल्या मुलांसमवेत घरोघरी व पालकांपर्यंत पोहोचवा; अन्यथा शहर वाहतूक पोलिसांकडून कठोर दंडात्मक कारवाईकरण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शिकवणी चालकाना दिलेल्या लेखी समज पत्रात म्हटले आहे की, इयत्ता ५ ते १२ वी या वर्गाचे शिकवणी घेतात. शिकवणीसाठी येणारे विद्यार्थी हे १८ वर्षांखालील असतात. मुलांचे पालक मुलांना मोटारसायकल देऊन तासाला पाठवतात. क्लाससाठी येणारे मुला-मुलींना मोटारसायकलवरून येण्यास प्रतिबंध करावा.
संबंधित पालकांना लेखी कळवावे. १८ वर्षाआतील मुलांना मोटारसायकल चालविल्यास संबंधित वाहनचालक व पालक (मालक) यांच्यावर मोटार वाहन कायदा कलम १९९ अ प्रमाणे २५००० दंड व तीन वर्षे कारावास अशी कायद्यात तरतूद आहे.
अशी दंडात्मक कारवाई व शिक्षा होऊ शकते यांची कल्पना विद्यार्थी व पालक यांना देण्यात यावी व क्लासबाहेर १८ वर्षांखालील मुलांनी मोटारसायकलवरून येऊ नये. अशा प्रकारचा फलक तयार करून लावावा. जेणे करून विद्यार्थी मोटारसायकलवरून येणार नाहीत याची खबरदारी घेण्यात यावी.
य पत्राची झेरॉक्स प्रत प्रत्येक पालकापर्यंत पोच करावी. समजपत्रानुसार कार्यवाही झालं नाही तर बार्शी शहर पोलिस दंडात्मव कारवाई करतील, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
खासगी शिकवणी वर्ग चालक व विद्यार्थ्यांमार्फत पालक, मोटारमालकांना लेखी समजपत्र पाठविण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी न झाल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. – धन्नाप्पा शेटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, शहर वाहतूक शाखाप्रमुख
