वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त रोहिदास पवार यांची माहिती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कल्याणी नगर येथे १९ मे रोजी दुर्दैवी अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्यानंतर पुणेकर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर अधिक सतर्क झालेल्या पुणे शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकावर कारवाई करत तब्बल १२,२१,९३,५५०/- एवढी दंडाची रक्कम वसूल केली आहे. अशी माहिती पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त रोहिदास पवार यांनी दिली.
शहरातील वाहन चालकांनी वाहतूकीचे नियम पाळण्याकरीता तसेच वाढत्या अपघांताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक शाखेकडुन विशेष कारवाई करण्यात येत आहे. कारवाई दरम्यान ड्रंक अॅड ड्राईव्ह, रॅश ड्राइव्हिंग, विरुध्द बाजूने वाहन चालवणे ही कारणे अपघातास कारणीभुत ठरत असल्याने विशेष कारवाई मध्ये मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
तसेच शहरातील महत्वाच्या चौकामध्ये रात्री होणाऱ्या अपघातांवर अंकुश लावण्याकरीता नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. सदर विशेष कारवाई अंतर्गत दिनांक २१ मे २४ ते ०८ जुलै २०२४ या कालावधीत एकुण १,५८,२६९ कारवाई करून रूपये १२,२१,९३,५५०/- एवढी दंडाची रक्कम वसुल करण्यात आली आहे.
यामध्ये ड्रंक अॅड ड्राईव्ह करणाऱ्या वाहन चालकांवर एकुण १२३२ कारवाई करण्यात आली आहे. तसेच ०१ ते ०८ जुलै या सप्ताहात विशेष कारवाई अंतर्गत रॅश ड्रायव्हिंग, नो नंबर प्लेट/फॅन्सी नंबर प्लेट, ट्रीपल सीट, रॉग साईड, जड वाहनांवर कारवाई व ड्रंक अॅड ड्राईव्ह अशा एकुण ४५२२ कारवाई करण्यात आल्या असुन यामध्ये ड्रंक अॅड ड्राईव्ह करणाऱ्या वाहन चालकांवर एकुण १०७६ कारवाई करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे दैनंदिन विशेष कारवाई अंतर्गत दिनांक ०७ ते ०८ जुलै या एकाच दिवसात मोटार वाहन कायद्या अंतर्गत सर्व नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांवर एकुण ७५४९ कारवाई करण्यात आल्या असुन रक्कम रूपये ४९,७९,९५०/- एवढी दंडाची रक्कम वसुल करण्यात आली आहे.
दिनांक ०१जानेवारी पासुन ते दिनांक ३०जून २०२४ पर्यंत १६८४ ड्रंक अॅड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली असुन दारू पिवून वाहन चालवण्याऱ्या वाहन चालकांचे वाहनचालक परवाना निलंबीत करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.
