महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेतात काम करण्यासाठी आला नाही या कारणावरून एका आदिवासी कातकरी शेतमजुराचा वार करून व नंतर अंगावर भरधाव कार घालून खून केल्याची घटना घडली आहे. तसेच या मजुराची पत्नी अनुसया यांच्याही अंगावर कार घालून मारण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मांडवी बुद्रुक येथे दि. ३ जुलै रोजी रात्री घटना घडली आहे. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तात्या ऊर्फ भरत लक्ष्मण वाल्हेकर (वय ५०, रा. मांडवी बुद्रुक), असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
हवेली पोलिस ठाण्यात संजय इंदुराव पायगुडे व सचिन नथुराम पायगुडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.कोयत्याचा वार झाल्यानंतर आरोपींनी त्यांच्या मागे भरधाव वेगाने चारचाकी वाहन घातले होते.
त्यात भरत वाल्हेकर यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नीला मारण्याचा प्रयत्न करून आरोपींनी तेथून पलायन केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेली पोलिस ठाणे हद्दीत मांडवी बुद्रुक येथे शेतकामासाठी तात्या ऊर्फ भरत वाल्हेकर व त्यांची पत्नी अनुसया या मागील काही वर्षापासून वास्तव्यास आहे.
हे दाम्पत्य गावात मिळेल त्याच्याकडे शेतीकाम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, ३ जुलै रोजी रात्री वाल्हेकर दाम्पत्य मांडवी खुर्द येथून मांडवी बुद्रुक येथे मुख्य डांबरी रस्त्याने पायी जात असताना मांडवी बुद्रुक येथील बस स्टॉपच्या मागे काही अंतरावर आले असता, चारचाकीतून आलेल्या दोन आरोपीपैकी सचिन नथुराम पायगुडे याने कोयता घेऊन तुम्ही माझ्याकडे शेतात कामाला का नाही आला, असे म्हणून भरत वाल्हेकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला.
त्यांना वाचविण्यासाठी पत्नी आली असता आरोपीने उलटा कोयता मारून जखमी केले. याप्रकरणी दोन आरोपींचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सचिन बांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार, पोलिस हवालदार संतोष तोडकर, पोलिस नाईक गणेश धनवे, संतोष भापकर, सचिन गुंड यांनी केली.

















