महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लॉगिन पिन रिसेट करण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. ०९) कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३ जूनला घडला आहे.
याबाबत मोहम्मदवाडी परिसरात राहणाऱ्या ५२ वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेला बँकेसारख्या दिसणाऱ्या नावावरून मेसेज आला. “तुमचे युनियन बँकेचे मोबाईल अॅप्लिकेशनचे पिन रिसेट करण्याची आवश्यकता आहे” असा मजकूर होता.
त्यामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर त्यांच्या मोबाईलवर एक अनोळखी अॅप्लिकेशन डाऊनलोड झाले. त्यामध्ये त्यांनी बँकेची खासगी माहिती टाकली. त्या माहितीचा गैरवापर करून सायबर चोरट्यांनी महिलेच्या खात्यातून ७५ हजार रुपये काढून घेतले, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

















