महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पॉलिसी सेटलमेंट करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मंगळवारी (दि. ०९) उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शिवणे परिसरात राहणाऱ्या एका ३७ वर्षीय तरुणाने या प्रकरणीपोलिसांना फिर्याद दिली आहे. अनोळखी आरोपीने फिर्यादींना फोन करून एचडीएफसी बँकेतून मोहन पाठक नावाचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या पॉलिसीबद्दल माहिती देऊन पॉलिसी सेटलमेंट करण्यासाठी फोन केल्याचे सांगितले.
त्यामध्ये मूळ रक्कम १७ लाख ७२ हजार आणि बोनस रक्कम २ लाख ४६ हजार रुपये असून तुम्हाला काढायची असल्यास आमच्या वरिष्ठांशी बोलावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरून फोन करून लिंक पाठवत त्यावर क्लिक करण्यास सांगितले. त्याद्वारे रिमोट अॅक्सेस मिळवून फिर्यादीच्या खात्यावर ६ लाख २४ हजारांचे परस्पर लोन घेत फसवणूक केली. असे तक्रारीत म्हटले आहे.
