वर्धमान प्रतिष्ठानमध्ये गुरुपोर्णिमेनिमित्ताने विशेष मार्गदर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : ज्याला गुरु मिळतो तो भाग्यवान असतो कारण अंधारातून प्रकाशाकडे नेणारी व्यक्ती गुरु असते. जितके महत्त्व गुरुला असते तितकेच महत्त्व हे शिष्याला देखील असते. असे विचार साध्वी शिलापीजी यांनी आपल्या प्रवचनात मांडले.
वर्धमान प्रतिष्ठान येथे चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचनमालेमध्ये गुरुपोर्णिमा निमित्ताने विशेष मार्गदर्शन करण्यात आले. या प्रवचनाला भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पारख उपस्थित होते. गुरुपौर्णिमे निमित्त गुरुवंदना करून प्रवचनाला सुरुवात झाली.
आपल्या प्रवचनात साध्वी शिलापीजी म्हणाल्या की, जर आठ वर्षांचा मुलगा हातात पिस्तूल घेऊन हत्या करत असेल तर त्याला आपण विकास म्हणू शकत नाही. जेव्हा आपले मन दैवत्वाशी जोडले जाईल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने विकसित झालो असे म्हणता येईल.
आपल्याकडे प्रवासासाठी वाहनांची संख्या वाढत असेल, खर्च करण्यासाठी पैसे येत असतील पण जर आपण आतून शांत नसू तर मिळवलेल्या संपत्तीचा काहीही उपयोग नसतो म्हणूनच बहिर्गत विकासासोबतच अंतर्गत विकास देखील होणे गरजेचे आहे. अ
से प्रतिपादन त्यांनी केले. देवाची वाणी आपल्याला योग्य रस्ता दाखवत असते पण त्यावरून चालणं हे आपल्या हातात असते आणि जैन धर्म हा स्वतः चालण्याचा एक धर्म आहे. शरीर हे साधनेचे माध्यम आहे, म्हणून त्याची काळजी घेणे हे अतिशय आवश्यक आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.
मनाच्या ताकदीविषयी बोलताना त्या म्हणाल्या, विचार करण्याच्या प्रक्रियेलाच मन म्हणतात, मन आपल्या नियंत्रणावर नाही, तर आपण मनाच्या नियंत्रणावर चालत असतो. मन ही आपल्या आयुष्यासाठी महत्त्वाची बाब आहे. मन ही खूप मोठी शक्ती असून ज्याने मनाला साधले त्यांनी खऱ्या अर्थाने साधना केली असे म्हणता येईल.
मनाच्या ताकदीमुळेच आतापर्यंत जगभरात अनेक संशोधन झाले त्यातीलच एक उदाहरण म्हणजे कोरोना रोगासाठी लस आपल्याला सांगता येईल. मनाविषयी सांगत असताना आधुनिक युगातील उदाहरण देताना मोबाईल विषयी त्यांनी सांगितले. मोबाईल मधून आपण अनेक गोष्टी डिलीटही करू शकतो आणि नव्याने साठवू पण शकतो.
पण मनामध्ये नेमके काय साठवावे ही खूप कठीण गोष्ट असते. कारण एकदा मनात साठवलेली घटना किंवा गोष्ट लवकर डिलीट करता येत नाही आणि आपले इतरत्र सुरू असलेल्या घटनांपैकी आपण वाईट गोष्टी आधी लक्षात ठेवतो आणि चांगल्या गोष्टींविषयी मात्र आपल्याला खूप विचार करावा लागतो. असे देखील त्यांनी सांगितले.
पुढे चातुर्मासाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, जोपर्यंत आत्मशक्तीचा आपल्याला परिपूर्ण अनुभव येत नाही तोपर्यंत आपण मनाच्या शक्तीवर चालत असतो. चातुर्मास हा स्वतःशी संवाद साधण्याचा एक उत्तम मार्ग आहे. या चातुर्मासात आपण काय मिळवले आणि काय गमावले याचा निकाल आपल्याला कार्तिक पौर्णिमेला दिसून येईल.
वर्षातील आठ महिने हे दुसऱ्यासाठी आणि चातुर्मासाचे चार महिने हे स्वतःसाठी असे हे वर्षाचे गणित आहे. असे विचार त्यांनी प्रवचनात मांडले. गुरुचे महत्व सांगून त्यांनी आपल्या प्रवचनाचा समारोप केला.
