खडकी पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कामावरून काढून टाकल्याने तरुणाने बोपोडीतील नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येस प्रवृत केल्याच्या कारणावरून कंपनी व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल प्रमोद साळवी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. साळवी याला आत्महत्येस प्रवृत केल्याच्या आरोपावरून कंपनीचे व्यवस्थापक झिशान हैदर याच्या विरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशाल प्रमोद साळवी हा एका खासगी कंपनीत कामाला होता.
कंपनीतील व्यवस्थापक झिशान हैदर याने विशालला कंपनीतील कामगारासमोर अपमानित केले. कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली होती. विशालला कामावरून कमी करण्यात आल्याने विशाल नैराश्यात होता. त्याने बोपोडीतील नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी विशालने सोशल मीडियावर चिठ्ठी आणि झीशान हैदरचा फोटो टाकला होता. कामावरून काढून टाकणे, तसेच कंपनी व्यवस्थापकाच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद करण्यात आले होते. असे विशालची बहीण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. हा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले करत आहेत.
