बार्शीचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांची सामाजिक बांधिलकी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : समाजात खाकीवर्दीला अतिशय कठोर स्वभाव असलेले खाते असे समजले जाते. गुन्हेगार पोलिसांच्या नजरेला घाबरून असतात. पण पोलिसातही समाजसेवेचे ह्दय असलेली काही माणसेही असतात. याचे दर्शन शहरात झाले आहे.बार्शी शहर पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या सामाजिक बांधिलकी मुळे शहरातील रस्त्यावर राहणाऱ्या दोन निराधार मनोरुग्ण महिलांना प्रेमाचा आसरा मिळाला आहे.
बार्शी शहरात गेले अनेक वर्षापासून एक मनोरुग्ण महिला अर्धनग्न अवस्थेत उन, वारा पावसात स्वतःचे घर व आधार नसताना रस्त्यावर भीक मागून जगत होती. तिच्याकडे आजपर्यंत कोणाचेही लक्ष गेले नाही किंवा तिला कोणी मदतीचा हात पुढे केला नाही.
ती शिवाजी कॉलेज परिसर, कोर्ट परिसर व मुख्य बाजारपेठ बार्शी येथे फिरत असायची. तिला झोपण्यासाठी जागा नसायची तेव्हा ती रस्त्यावर कुठेही आसरा घेवून अर्धनग्न अवस्थेत झोपत असायची. बार्शी शहरात पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना ती दिसून आली.
त्यांनी तिच्याबाबत आस्थेने चौकशी केली. तिचे नाव, गाव, पत्ता कोणालाच माहित नव्हते. तसेच तिच्याबाबत पोलीस रेकॉर्ड तपासले असता त्यातून काही सुध्दा माहिती निष्पन्न झाली नाही. त्या मनोरुग्ण निराधार महिलेला आधार व निवाऱ्याची गरज असल्याची जाणीव कुकडे यांना झाली.
त्यांच्या खाकी वर्दीतील माणूस जागा झाला. या महिलेला मदतीची गरज असल्याचे त्यांनी जाणले.कुकडे यांनी लातूर जिल्हयात काम केलेले असल्यामुळे त्यांनी तेथील सामाजिक कार्य करणारी संस्था रिलीजन टू रिस्पॉसीबिलीटी फाऊंडेशन लातूर या संस्थेला संपर्क साधला व या महिलेबाबत माहिती दिली.
तीला पुनर्वसनाची गरज असल्याचे सांगितले. या संस्थेच्या संस्थेचें राहूल पाटील व इतर सदस्यांनी दि. २१ जुलै रोजी बार्शी येथे येऊन बार्शी शहर पोलीस ठाणेच्या मदतीने म हिलेस व तिच्या सोबत आणखी एक महिला मिळून आल्याने त्या दोघींना ताब्यात घेतले.
त्यांनाकायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दिव्यसेवा प्रकल्प बुलढाणा येथे पुनर्वसनाकरीता सुखरूप रित्या पाठवून दिले.दोन्ही महिला दिव्यसेवा प्रकल्प बुलढाणा येथे व्यवस्थितरित्या पोहोचल्या असून त्यांना आधार, निवारा तसेच ओषधोपचार मिळालेले आहेत.
बार्शी शहरात बेवारस किंवा मनोरुग्ण कोणीही आढळून आल्यास बार्शी शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी केलेले आहे. अशा बेवारस व मनोरुग्ण व्यक्तींना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आधार व निवारा उपलब्ध करून देण्यात येईल.
सदरची कामगिरी ही पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे व सोबत पोलीसहेड कॉन्स्टेबल बाबासाहेब घाडगे, अमोल माने, रामेश्वर मस्के व रिलीजन टू रिस्पॉसीबिलीटी फाऊंडेशन लातूर या संस्थेचे राहूल पाटील, मुस्तफा सय्यद, आकाश गायकवाड, आसिफ पठाण, गोपाल ओझा यांनी केलेली आहे. त्यांच्या या कामगिरीचे पोलीस खात्यात तसेच शहरात कौतुक होत आहे.