भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रात्रीच्या वेळेस गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर भरधाव कार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न शनिवारी पहाटे झाला आहे. कारच्या दिशेने स्वसरंक्षणार्थ पोलीसांनी एक राउंड फायर केल्याची खळबळजनक घटना कात्रजच्या वंडरसिटी परिसरात मध्यरात्री अडीच च्या सुमारास घडली आहे.सुदैवाने पोलीस पथकातील कोणीही जखमी झाले नाही.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक रतिकांत चंद्रशा कोळी (वय ३०, रा. स्वारगेट) यांनी फिर्याद दिली आहे. चार अज्ञात व्यक्तीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रतीकांत कोळी हे शनिवारी रात्री पोलीस पथकासह ओंन ड्युटी होते.
कात्रज नजीकच्या वंडर सिटीजवळ त्यांना संशयास्पद हालचाल दिसून आली. तेथे एक कार होती व त्यातील तरुण काहीतरी करत होते.त्यांनी या कारला गाडी आडवी घातली आणि ते कारजवळ जाऊ लागले, त्याच क्षणी चोरटे कारमध्ये बसले आणि कार रिव्हर्स घेऊन पळण्याचा प्रयत्न केला.
कारला थांबवण्यासाठी कोळीही कारच्या दिशेने पळू लागले. यांनतर कार चालकाने अचानक गाडी कोळी यांच्या दिशेने दामटली. गाडी अंगावर येत असल्याचे दिसताच कोळी यांनी स्वसंरक्षणार्थ सर्व्हिस पिस्तूलमधून कारच्या मागच्या चाकावर फायर केले. मात्र कार भरधाव नवले ब्रीजच्या दिशेने पळून गेली.
चोरटे नेमके काय करत होते हे पाहण्यासाठी पथक पुन्हा घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा त्यांना एका ट्रकच्या डिझेल टाकीचे नटबोल्ट काढून त्यात पाईप टाकून एका कॅनमध्ये डिझेल भरण्याचा प्रयत्न केला असल्याचे आढळले. यावरून ही टोळी डिझेल चोरणारी असल्याचे लक्षात आले.
पोलीसांनी तातडीने परिसरात गस्तीवर असलेल्या पथकांना सूचित केले, मात्र ती कार आढळून आली नाही. चोरटे स्थानिक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अद्याप काहीही सुगावा लागला नसून पोलीस त्यांच्या शोधात आहेत.
