संस्थेत शानदार ‘टाउनहॉल’ चे आयोजन : नव्या उपक्रमांची मांडणी
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : भारतीय जैन संघटना (बीजेएस) ही सामाजिक संस्था गेल्या चार दशकांपासून समर्पित भावनेने देशभरात सेवा देते. यात दीर्घकाळ कार्यरत व नव्याने रुजू झालेल्या तब्बल ४८ कर्मचाऱ्याना सन्मानित करण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण, कौटुंबिक-सामाजिक व्यवस्था, जल व्यवस्थापन (तलावांचे पुनरुज्जीवन) आदी क्षेत्रांतील कार्याचा संस्थेस प्रदीर्घ अनुभव आहे. ज्येष्ठ समाजसेवक तथा बीजेएसचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने विविध उपक्रमांमध्ये राज्य-केंद्र शासनासोबत यशस्वीपणे काम केले असून अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी संस्थेचा गौरव झाला आहे.
या वाटचालीत दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याचा सन्मान करण्यासाठी बीजेएसने शानदार टाउनहॉलचे आयोजन केले होते. यात दीर्घकाळ कार्यरत व नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्याना सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे ५ ते ३१ वर्षांपर्यंत कार्यरत असलेल्या तब्बल ४८ कर्मचाऱ्याचा यात समावेश होता.
अशोक पवार हे ३१, तर स्वाती पाध्ये, सत्यवान झरेकर हे २१ वर्षांपासून कार्यरत असून संस्थेत सध्या विविध क्षेत्रातील पारंगत १११ कर्मचारी पूर्णवेळ काम करतात. या प्रसंगी शांतिलाल मुथ्था म्हणाले, ‘वीस-वीस, तीस-तीस वर्षांपासून काम करणारे कर्मचारी, नि:स्वार्थ भावनेने काम करणारे देशभरातील बीजेएसचे कार्यकर्ते-पदाधिकारी या सर्वांच्या साथीने बीजेएसने अभूतपूर्व काम केले, याचा अभिमान वाटतो. भविष्यात त्याच समर्पित भावनेने, पूर्ण क्षमतेने शासनासोबत काम करू आणि देशात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हातभार लावू, असा पूर्ण विश्वास वाटतो.
मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन यांनी संस्थेच्या सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेऊन भविष्यातील काही नव्या उपक्रमांची सविस्तर मांडणी केली. शांतिलाल मुथ्था यांचे स्वप्न साकार करण्यासाठी, त्यांच्यासोबत सर्वजण झोकून देऊन काम करू, असा विश्वास व्यक्त केला.
















