हडपसर पोलिसांनी केली चालकाला अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नवीन दुचाकी घेतल्यानंतर मित्राबरोबर दुचाकीवरून चक्कर मारणे तरुणाच्या जीवावर बेतले आहे. भरधाव टँकरची धडक बसल्याने दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला. अथर्व कुंभार असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना केशवनगर येथील रेणुका माता मंदिराजवळ शनिवारी (दि.२७) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली.
याबाबत अमन विनोद चौधूर (२३, रा. केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी टँकर चालक संतोष शिवसेवक सिंह (३२, रा. केशवनगर, मुंढवा) याला अटक केली आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादीयांनी नवीन दुचाकी घेतली. त्यांचा मित्र अथर्व कुंभार याला घेऊन ते नवीन दुचाकीवरून फेरफटका मारण्यासाठी गेले होते. समोरून भरधाव आलेल्या पाण्याच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात फिर्यादी जखमी झाले असून, अथर्व कुंभार यांचा मृत्यू झाला. हा तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे करत आहेत.

















