मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा बहाणा करून अटकेची भीती दाखवत सायबर चोरट्यांचा डाव
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आधार कार्डचा गैरवापर करून बनावट बँक खाते उघडण्यात आले असून त्याद्वारे मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा खोटा आरोप करत अटकेची भीती दाखवून दोन ज्येष्ठ नागरिकांची सुमारे सव्वातीन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
एरंडवणे येथील ७० वर्षीय नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार १३ जानेवारी ते ४ फेब्रुवारीदरम्यान घडला. फिर्यादी यांना ‘राहुल रॉय, पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऑफ इंडिया, अंधेरी वेस्ट’ येथून बोलत असल्याचे सांगत एका व्यक्तीने फोन केला.
तुमच्या आधार कार्डचा वापर करून मोबाईलद्वारे अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पाठवले जात आहेत, अशी तक्रार नोंद असल्याचे त्यांना सांगण्यात आले. तसेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संपर्क असल्याचा आरोप करून त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून दीड कोटी रुपयांचा फ्रॉड झाल्याचेही सांगण्यात आले.
ही बाब कोणालाही सांगू नका, ही सर्वोच्च न्यायालयातील केस आहे, असे सांगत फिर्यादी व त्यांच्या पत्नीवर सतत दबाव टाकण्यात आला. अटकेची भीती दाखवून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण २ कोटी १ लाख ९० हजार २४७ रुपये भरण्यास भाग पाडण्यात आले.
धमक्यांमुळे घाबरलेल्या दांपत्याने पुण्यातील आपल्या मुलगी व जावयालाही ही बाब सांगितली नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक देवकाते करीत आहेत. दुसरी घटना वानवडी येथे घडली आहे. ८६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला १९ डिसेंबर २०२५ रोजी व्हॉट्सअॅप कॉल आला.
कॉल करणाऱ्यांनी पोलीस गणवेशात असल्याचे भासवून स्वतःला मुंबई पोलीस अधिकारी एस. लक्ष्मण आणि प्रदीप सावंत असे सांगितले. कुलाबा पोलीस ठाण्यात मनी लॉन्ड्रिंगची केस असून फिर्यादी यांच्या नावावर कॅनरा बँकेत खाते असल्याचे सांगण्यात आले. त्या खात्याचा गैरवापर झाल्याचा आरोप करून अटकेची भीती दाखवण्यात आली.
फिर्यादी यांच्या सर्व बँक खात्यांची माहिती घेऊन ‘पडताळणीसाठी’ रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले. दबावाखाली त्यांनी वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण १ कोटी २७ लाख ५३ हजार रुपये जमा केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी घ्या ही काळजी
ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी क्रमांकांवरून येणारे कॉल उचलणे टाळावे.
व्हॉट्सअॅप कॉल किंवा अपरिचित व्यक्तींचे कॉल स्वीकारू नयेत.
‘हाऊस अरेस्ट’ किंवा अटकेची धमकी दिल्यास घाबरू नये.
कोणतीही संशयास्पद बाब तात्काळ जवळच्या नातेवाईकांना सांगावी.
अनोळखी व्यक्तींना आपल्या आर्थिक व्यवहारांची माहिती देऊ नये.
मोबाईलचा वापर केवळ आवश्यक तेवढाच करावा.
घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवावे व बँक व्यवहारांची मर्यादा निश्चित करून द्यावी.















