बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे सांगून ४१ जणांना सोने तारण कर्ज देऊन बँकेची फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कल्याण जनता सहकारी बँकेने नेमलेल्या गोल्ड व्हॅल्युअरने संगनमत करून ४४ जणांना सोनेतारण कर्जासाठी बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचा अहवाल दिला. बँकेने सोनेतारणावर कर्ज दिल्यानंतर गोल्ड व्हॅल्युअर फरार झाला असून कल्याण जनता सहकारी बँकेला तब्बल १ कोटी १६ लाख ५६ हजार २१७ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
कल्याण जनता सहकारी बँकेचे उपव्यवस्थापक निलेश दत्तात्रय देशमुख (वय ५०, रा. अमनोरा पार्क टाऊन, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गोल्ड व्हॅल्युअर अजित प्रभाकर कुलकर्णी, मे. मोतीवाले लक्ष्मण गणेश कुलकर्णी सांगलीकर सराफ ज्वेलर्स यांच्यासह ४१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार कल्याण जनता सहकारी बँकेच्या वारजे शाखा व बिबवेवाडी शाखेत २६ ऑक्टोबर २०२० ते ३० जून २०२१ दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण जनता सहकारी बँकेने सोनेतारण कर्ज देण्यापूर्वी सोन्याच्या दागिन्यांची सत्यता तपासणे, त्यांचे वजन व मूल्य तपासणी करून त्यावर अहवाल देण्यासाठी बँकेकडून मूल्यांकनकर्ता या पदावर अजित कुलकर्णी यांची ३१ मार्च २०१८ पासून नेमणूक केली होती. त्यांच्या पदाचे वेळोवेळी नूतनीकरण करण्यात आले होते.
२१ ऑगस्ट २०२० ते ३० जून २०२१ या कालावधीत २२ ग्राहकांना सोनेतारण कर्ज देण्यात आले. या कर्जदारांनी सोन्याची पोत, हार, पदक हार, बांगड्या, कडा, चैन, अंगठ्या व इतर दागिने आणले होते. अजित कुलकर्णी यांनी या सोन्याच्या दागिन्यांची सत्यता तपासून त्यांचे मूल्यांकन प्रमाणपत्र बँकेस सादर केले.
या प्रमाणपत्रावरून बँकेने सर्व २२ कर्जदारांना एकूण ४४ लाख रुपयांचे सोनेतारण कर्ज, वार्षिक साडेआठ टक्के व्याजदराने व एक वर्ष परतफेडीच्या अटीवर दिले. त्यातील काही ग्राहकांनी १५ जानेवारी २०२२ पर्यंत मुद्दलापोटी १ लाख ४८ हजार ३५० रुपये आणि व्याजापोटी ३ लाख ६९ हजार ४७३ रुपये बँकेत जमा केले.
त्याचप्रमाणे कल्याण जनता सहकारी बँकेच्या वारजे शाखेने २६ ऑक्टोबर २०२० ते ३० जून २०२१ या कालावधीत २२ कर्जदारांना सोनेतारण कर्ज दिले. अजित कुलकर्णी यांच्या अहवालावरून १७ जणांना प्रत्येकी २ लाख रुपये, तिघांना प्रत्येकी ५ लाख रुपये आणि एकाला ४ लाख ७० हजार रुपये असे एकूण ५३ लाख ७० हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले.
त्यातील काही ग्राहकांनी २७ डिसेंबर २०२१ पर्यंत मुद्दलापोटी ७ लाख १७ हजार ९४६ रुपये व व्याजापोटी ४ लाख ६० हजार १९८ रुपये बँकेत जमा केले. दिलीप भिमराव गायकवाड व आशुतोष पद्माकर मुळे यांनी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी संपूर्ण कर्जरक्कम व व्याज भरून कर्ज खाते बंद केले.
बँकेने ४१ कर्ज प्रकरणांमध्ये तारण ठेवलेल्या सोन्याचे पुनर्मूल्यांकन व फेरतपासणी करण्याचे ठरविले. ६ ऑगस्ट २०२५ रोजी बिबवेवाडी शाखेत आणि ७ ऑगस्ट २०२५ रोजी वारजे शाखेत बँकेने नेमलेल्या गोल्ड व्हॅल्युअर यांनी सर्व दागिन्यांची पडताळणी केली.
त्यांनी तारण ठेवलेले सर्व सोने खोटे असल्याचा अहवाल बँकेस सादर केला. यानंतर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील तपास करत आहेत.
गोल्ड व्हॅल्युअर झाला फरार – या दोन शाखांतून ४४ जणांना सोनेतारण कर्ज दिल्यानंतर काही महिन्यांपर्यंत त्यांनी नियमित हप्ते भरले. त्यानंतर त्यांनी कर्जफेड थांबविली. बँकेने पाठविलेल्या नोटिसांना त्यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे बँकेने गोल्ड व्हॅल्युअर अजित कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ते घरी व कार्यालयातही न आढळल्याने ते परागंदा झाल्याचे स्पष्ट झाले. कर्जदारांनी वारंवार नोटिसांनंतरही कर्जफेड न केल्याने बँकेने २०२२ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज केला होता.















