कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : क्रेडिट कार्डचे बिल भरण्याच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी रविवारी (दि. २८) कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने पोलिसांत तक्रार दिली आहे. अनोळखी क्रमांकावरून फोन येऊन बँकेतील क्रेडिट कार्ड विभागातील कर्मचारी बोलत असल्याचा बनाव तरुणाने केला.
बँकेने क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी नवीन अॅप्लिकेशन सुरू केल्याचे सांगितले. त्यासाठी मी तुम्हाला सर्व माहिती समजावून सांगतो असे सांगून तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एक लिंक पाठवत त्याद्वारे अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले.
त्याद्वारे मोबाइलचा संपूर्ण ताबा मिळवून तरुणीच्या खात्यातून परस्पर ६० हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तपास कोंढवा पोलीस करत आहेत.