वर्धमान प्रतिष्ठानमध्ये सुंदर विचारांचे दर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पाणी खालच्या दिशेने सहजपणे वाहत जाते त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. त्याप्रमाणे आपले मनसुद्धा अशांतीकडे, विकृतींकडे सहजतेने धाव घेते. परंतु त्याला वरच्या दिशेने न्यायचे असेल तर मात्र प्रयत्न करावे लागतात. आयुष्यात मनाची शांतता सर्वांत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.
वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने आयोजित केलेल्या प्रवचनमालेत पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी मौलिक मार्गदर्शन केले. या वेळी भाविक मोठ्या संख्येने व श्रद्धेने उपस्थित होते.पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, आपले मन कायम अशांत राहते. ते विकृतीकडे धाव घेते.
मनात अशांतता, भीती घर करून राहते अशा परिस्थितीत मनाला सावरणे आणि शांत राखणे आवश्यक असते. आपल्या मनाची अवस्था चांगली नसते, अशांतता असते तेव्हा आपण जर डाॅक्टरकडे गेलो तर ते गोळ्या देतात. त्या घेतल्यानंतर काही काळापुरते बरे वाटते. परंतु त्या गोळ्यांचा परिणाम कमी झाला की पुन्हा मनात अशांतता निर्माण होते.
हे बदलायचे असेल तर मन शांत राहिल हे पाहायला हवे. मन शांत राहू द्यायचे असेल तर ते सदैव प्रसन्न राहायला हवे. त्यासाठी आपण परमात्म्याला शरण जायला हवे. चांगल्या विचारांनी मन भरायला हवे.
आपण जेव्हा पोटभर जेवतो तेव्हा आपले पोट पूर्ण भरते त्याप्रमाणे स्तोत्र पाठ, प्रार्थना, चांगले विचार ऐकून आपले मनही तृप्त व्हायला हवे. प्रार्थना, पूजापाठ या सगळ्यांतून मन शांत व्हायला हवे.
प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनी विविध प्रकारचे भाव कसे आहेत या विषयी मौलिक मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होण्याबरोबरच आपण जेव्हा इतरांच्या सुखातही सुखी होतो त्याला अनुकंपा म्हणतात. ती जीवनात फार महत्त्वाची आहे.
आपले भावजीवन बदलत नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. जीवनातील महत्त्वपूर्ण निर्णय हे भावनेने घेतले जातात म्हणून ते समजून घ्यायला हवे. भगवान महावीर यांच्या भूमीत बिहारमध्ये जाऊन काम करायचे या मागची ताई माँ यांची भावनाच इतकी उच्च कोटीची होती की कितीही अडचणी आव्हाने आली तरी त्यावर मात करून त्यांनी तिथे मोठे काम उभे केले.
परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे बदलणार नाही हे लक्षात घेऊन ज्या गोष्टी बदलणार नाहीत त्यांचा स्वीकार करा आणि ज्या बदलू शकतात त्यासाठी पुढे पाऊल टाकून धाडसाने त्या बदलून दाखवा. आपले लक्ष क्षणभंगुरतेकडे अधिक असते. जे शाश्वत आहे त्याकडे आपण पाहत नाही. जेव्हा शाश्वत बाबींवर लक्ष केंद्रित होते तेव्हा जीवनाला योग्य दिशा मिळते. अनित्यभाव जागणे महत्त्वाचे आहे.
