वर्धमान प्रतिष्ठानमध्ये विचारसुमनांचा दरवळ
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : महावीरांची अहिंसा करुणेमध्ये प्रकट होते. अनुकंपामध्येच आपल्यालाच सत्याचा अनुभव होतो. अनुकंपा हेच जीवनातील प्रथम चरण आहे. करुणेच्या भावनेचा विकास होणे आवश्यक आहे. त्याच बिंदूपासून आपण सिद्धत्वापर्यंत जाऊ शकतो, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.
वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने आयोजित केलेल्या प्रवचनमालेमध्ये मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, साधनेच्या मार्गावर चालण्यासाठी पहिले पाऊल सम्यत्व आहे.
सम्यत्व नसेल तर त्याची चालण्याची दिशा नक्की चुकेल. तो कुठे पोहचेल हे सांगता येत नाही. जे योग्य आहे ते पाहणे महत्त्वाचे आहे. दुःखी माणसाला पाहून आपल्याला दुःख नक्की झाले असेल. त्रस्त व्यक्तीला मदत करण्याची इच्छाही नक्की झाली असेल.
आपल्या जीवनात आपल्याला हा अनुभव नक्की आला असणार. म्हणूनच जीवनात ही अनुकंपा महत्त्वाची आहे. तेच साधनेचे प्रथम चरण आहे हे लक्षात घ्यायला हवे. खुद्द भगवान महावीर यांना अवमानित करण्याचा पुरेपूर प्रयत्न झालेला आहे.
आकाशातून देवतांनीही भगवान महावीरांना कष्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. जीवनात कष्टाच्या, संघर्षाच्या काळातही शांत कसे राहावे हे भगवान महावीरांकडून शिकण्यासारखे आहे. प. पु. साध्वी श्री शिलापीजी म्हणाल्या, भगवान महावीर यांची वाणी ताई माँ यांनी नुसती वाचलेली नाही ती आत्मसात केलेली आहे.
हजारो लोक त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सन्मार्गावर चालत आहेत. निःस्वार्थ भावनेने गेली २८ वर्षे त्या कार्यरत आहेत. अशुभाला हटवाल तेव्हा शुभ गोष्टींना जागा मिळेल. अंधार कितीही गडद असेल तरी एक छोटासा दीप अंधकार घालवू शकतो हे आपल्याला त्यांनी सांगितले आहे. धर्माचे विधायक स्वरुप त्या कायम समोर ठेवतात.
प. पु. साध्वी श्री शिलापीजी पुढे म्हणाल्या, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी आणि दुसऱ्यांच्या सुखाने सुखी होतो तीच खरी अनुकंपा असते. भावनांचे चिंतन महत्त्वपूर्ण आहे. आपल्या मनाचे कामच विचार करत राहणे हे आहे.
मन शून्य अवस्थेला पोहोचणे ही अवस्था दूर आहे. परंतु अशुद्ध मनाकडून शुद्ध मनाकडे पोहोचणे हेच पहिल्यांदा करावे लागेल. आपल्या भावनांवर चिंतन करणे आणि अंधार दूर करण्याचा मनाचा संकल्प करणे महत्त्वाचे आहे. अशुभापासून निवृत्ती आणि शुभ गोष्टींची प्रवृत्ती हेच चारित्र्य आहे.
















