प्रभाग ६ मध्ये बोगस मतदानाचा आरोप : एका केंद्रावार ईव्हीएम अर्धा तास ठप्प
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : राजकीयदृष्ट्या चर्चेत असलेल्या बार्शी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मंगळवारी (दि. २) झालेल्या मतदानात यंदा तुलनेने घट झाली. शहरातील 112 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडलेल्या मतदानात 63.36 टक्के मतदान नोंदवले गेले. शहरातील एकूण मतदारसंख्या 1,09,007 असून त्यापैकी 69,069 मतदारांनी मताधिकार बजावला. पुरुष 35,162, स्त्रिया 33,903 आणि इतर 4 जणांनी मतदान केले.
थंड हवामान असूनही सकाळपासूनच मतदारांनी केंद्रांवर रांगा लावून उत्साह दाखवला. दिवसभर चुरशीचे मतदान झाल्याने राजकीय वातावरण रंगत गेले. मतदान संपल्यानंतर दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत विजयाचे दावे–प्रतिदावे करण्यात आले.
आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, महाविकास आघाडीच्या उमेदवार निर्मला बारबोले तसेच महायुतीच्या उमेदवार तेजस्विनी कथले यांनी मतदान करून नागरिकांनाही मतदानासाठी प्रोत्साहित केले.
प्रभाग क्रमांक ६ मध्ये मतदानादरम्यान तीन महिलांनी बनावट आधारकार्ड दाखवून बोगस मतदानाचा प्रयत्न केल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश अक्कलकोटे यांनी केला. मात्र भाजपचे शहराध्यक्ष महावीर कदम यांनी हा आरोप फेटाळला.
साधना कन्या प्रशालेतील मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अर्ध्या तासासाठी मतदान प्रक्रिया ठप्प झाली. त्यामुळे अनेक मतदारांना काही काळ प्रतीक्षा करावी लागली. प्रभागातील वार्डबदलामुळे यंदा मतदारांची मोठी कोळंबी झाली. अनेक मतदार ज्या प्रभागात राहतात, तिथे मतदान केंद्र नसल्याने त्यांना दुसऱ्या प्रभागात जाऊन मतदान करावे लागले. यामुळे मोठी गैरसोय झाली आणि मतदानाची टक्केवारी घसरल्याचे दिसले.
तसेच बुथची माहिती नसणे, अनुक्रमांक व स्लिप वेळेवर न मिळणे यामुळे अनेकांना त्रास झाला. नागरिकांकडूनही या गैरसोयींबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मतदानाचा वेग मंदावला आणि सहभाग घटल्याचे स्पष्ट जाणवले.
प्रभाग क्रमांक ७ ब मधील एका जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी फेरनिवडणुकीची घोषणा केली असून २० डिसेंबर रोजी पुन्हा मतदान होणार आहे. बार्शी नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी जी ३ डिसेंबरला होणार होती, ती प्रशासनाने स्थगित केली आहे. आता मतमोजणी २१ डिसेंबर रोजी घेण्यात येणार असून संबंधित आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत.
निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी शहरात दिवसभर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलीस आणि एसआरपीएफ पथकांची नियुक्ती, मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही निगराणी आणि सततची गस्त यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात राहिली.
मतदान केंद्रांवर अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर, रॅम्प, स्वतंत्र रांगा आणि पिण्याच्या पाण्याची सोय अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या सुविधांमुळे या मतदारवर्गाला मोठी मदत झाली आणि त्यांनी समाधान व्यक्त केले.
















