वर्धमान प्रतिष्ठानमध्ये बहुमोल विचारधन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची धारा महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा केंव्हा संधी मिळेल तेव्हा ज्ञान प्राप्त करावे. परंतु ज्ञान संपादना नंतरसुद्धा प्रमाद होणार नाही या विषयी दक्ष राहायला हवे. जीवनात ज्ञानप्राप्तीची संधी सोडू नये, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.
वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांची प्रवचनमाला सुरू आहे. आज त्यांनी कर्मबंधनांविषयी मार्गदर्शन केले. या वेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, आत्मा आणि कर्म यांचे बंध असतात. त्याभोवती आपल्या सर्व संसारचक्र सुरू असते.
आपल्याकडे आठ प्रकारची कर्मे सांगितलेली आहेत. एक ज्ञान कर्म आहे. जे शरीराशी जोडलेले आहे त्या प्रत्येक अवयवाला नाव आहे. ते नाम कर्म आहे. आपण जर इतरांना सुख दिले तर आपल्यालाही चांगले शरीर प्राप्त होईल. जीवनाच्या सर्व क्षेत्रावर ज्याचा प्रभाव आहे त्याला मोहनीय कर्म म्हणतात. या आणि अशाच कर्मांशी संबंधित जीवनचक्र असते.
एखादा मुलगा चटकन गोष्टी लक्षात ठेवू शकतो तर एखाद्याला स्मरणशक्ती कमी असते. आपले जीवन हे ज्ञानाच्या कक्षेभोवती फिरत असते. इतरांशी चांगले बोलणे, चांगले ऐकणे महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराने आपण जगतो. जीवनाचा आधार शरीर आहे. त्यामुळे ते देखील स्वस्थ असायला हवे.
नामकर्माचे बंधनही आपण लक्षात घेतले पाहिजे. कोणताही त्रास न दिल्याने, इतरांना प्रसन्नता दिल्याने, गुरूजनांची सेवा केल्याने शुभनामकर्माचे बंधन निर्माण होते. आपल्याला जीवनात सुखाची अनुभूती येते. पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, नामकर्मामुळे आपले शरीर आणि मन प्राप्त झालेले आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व अधिक आहे. साधनेची सुरुवात भावनेने होती.
धर्म सुद्धा मोहनीय कर्माशी जोडलेला आहे. मोहनीय कर्माचा क्षय होतो तेव्हा सम्यकत्व प्राप्त होते. हा थोडा शास्त्रीय विषय असला तरी आपण सखोल चिंतन करून तो समजून घेणे गरजेचे आहे. भाविकांच्या मनातील शंकांनाही पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी उत्तरे दिली.
