गुन्हे शाखेची कारवाई : कोंढव्यातील चोरीची कबुली
पुणे : कोलवडी व कोंढवा परिसरात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत आरोपीने कोंढव्यातील चोरीची कबुली दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा, युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना पोलीस नाईक नितीन मुंढे यांना गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार महेश चव्हाण हा आव्हाळवाडी गायचे हददीत निळकंठेश्वर मंदिराजवळ, मोकळया मैदानात, येथे थांबलेला आहे.
ही माहिती वरीष्ठांना कळवली असता त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने तेथे जावून खात्री केली असता महेश चव्हाण हा संशयीतरीत्या थांबलेला दिसला. त्यास शिताफीने ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव महेश ऊर्फ महया काशिनाथ चव्हाण (वय १९ वर्षे रा. कॅनॉलजवळ, तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले.
त्याच्या अंगझडती दरम्यान खिशात सोन्याचे दागिने मिळून आले. त्याबाबत अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या इतर साथिदारांसह कोलवडी व कोंढवा परिसरात घरफोडी चोरी केल्याचे सांगून सदरचे सोन्याचे दागिने हे त्यातीलच असल्याचे कबूल केले आहे.