८४ पदकविजेत्यांमध्ये भारत ७१ व्या स्थानी
नवी दिल्ली : भारताला पॅरिस ऑलिंपिकमध्ये दुहेरी आकड्यांच्या पदकांची अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण झाली नाही. सहा पदकांवर भारताला समाधान मानावे लागले. नेमबाजी, कुस्ती, भालाफेक व हॉकी या खेळांमध्ये भारतीयांनी पदके जिंकली.
अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया यजमान फ्रांसचा या स्पर्ध्येत दबदबा दिसून आला.मनू भाकर, सरबज्योत सिंग, स्वप्नील कुसाळे, नीरज चोप्रा या खेळाडूंनी वैयक्तिक पदकांवर मोहोर उमटवली. भारताने हॉकी या सांधिक खेळातही बाजी मारली. आकडेवारीनुसार ८४ पदकविजेत्या देशांमध्ये भारत ७१ व्या स्थानी राहिला.
ग्रेट ब्रिटन, द.कोरिया, इटली यांची कामगिरी चांगली ठरली. १९०० मधील पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारत सर्वोत्तम १७ व्या स्थानावर होता. त्यानंतर १९२८ मधील अॅमस्टरडॅममधील ऑलिंपिकमध्ये भारत २३ व्या स्थानावर राहिला. त्यानंतर १९३२ मधील लॉस एंजिलिस ऑलिंपिक ते १९८० मधील मॉस्को येथील ऑलिंपिकपर्यंत भारताची सातत्याने घसरण होऊ लागली. पाकिस्तान फक्त एका सुवर्णपदक जोरावर ६२ व्या स्थानावर आहे.
पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने भालाफेकीत ९२ मीटरपेक्षा जास्त भाला फेकून ऑलिंपिक विक्रम नोंदवला. या विक्रमासह त्याने सुवर्णपदकही पटकावले. या एका सुवर्णपदकाचा पाकिस्तानला मोठा फायदा झाला. भारताने पॅरिस ऑलिंपिकमध्ये एकूण सहा पदके जिंकली आहेत. पॅरिस ऑलिंपिकची सांगता झाली असताना जगभरातील खेळाडूंना आता २०२८ मध्ये अमेरिकेत होणाऱ्या लॉस एंजिलिस ऑलिंपिकचे वेध लागले आहेत.
















