सांगवी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून एकाची ९५ लाख दहा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत सांगवी येथे घडला.
या प्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ‘वेल्थ फायनान्स अॅकॅडमी’चे राजदीप शर्मा, दिशा संन्याल यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपीने मोबाईलवर संपर्क साधून फिर्यादीस व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जॉइन केले.
फिर्यादीस शेअर मार्केट ट्रेडिंग करण्यासाठी टिप्स सांगितल्या. शेअर मार्केटमधून परतावा मिळवून देऊ, असा विश्वास दाखवला. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. ‘क्रिप्टो करन्सी’चे ट्रेडिंग करण्यास सांगून त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे सांगून विश्वास संपादन केला.
त्यानंतर फिर्यादीकडून ९५ लाख दहा हजार रुपये घेतले. या गुंतवणुकीवर फिर्यादी यांना अडीच कोटी रुपये फायदा झाल्याचे त्यांना अॅप्लिकेशनमध्ये दाखवण्यात आले. त्यानंतर फिर्यादींनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे १६ टक्के रक्कम फी म्हणून मागितली. त्या वेळी आपली फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.