महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आम्हाला नवी पेन्शन नको, जुनीच द्या या मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी मोर्चाकाढून जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी पुणे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले.
मोर्चामध्ये पुणे जिल्हा परिषदेतील सर्व संवर्गातील कर्मचारी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील सरकारी कामकाज ठप्प झाले होते. कार्यालयाबाहेर नागरिक बसून होते. पुणे जिल्हा परिषद सर्व संघटना समन्वय समितीच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला.
जिल्हा परिषद समन्वय संघटना समितीचे समन्वयक शेखर गायकवाड, बबन म्हाळसकर, उमाकांत सूर्यवंशी, किशोर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रदीप गोलांडे, इंद्रजित जाधव, सुहास संचेती, प्रकाश जामदार, वैशाली दुर्गाडे, मयूर एक्के, श्रीकांत वाव्हळ, अमोल घोळवे, विनोद चव्हाण,नारायण कांबळे, बाळासाहेब मारणे, शांताराम नेहरे, गणेश शिंदे, प्रकाश सणस, नवाज तोडीवाले आदी उपस्थित होते.
पेन्शनसाठी नियुक्त करण्यात आलेल्या जुन्या पेन्शन समितीच्या शिफारशीनुसार जीपीएस (गॅरेंटेड पेन्शन स्कीम) ही नवीन पेन्शन योजना प्रस्तावित केली आहे. नव्या योजनेचे स्वरूप हे केंद्राच्या नॅशनल पेन्शन स्किमप्रमाणे फसवे असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
त्यामुळे नव्या पेन्शन योजनेचा राज्यातील कर्मचारी निषेध करत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. राज्यातील जुनी पेन्शन योजना बंद करून सुमारे १८ वर्षांहून अधिक कालखंड लोटून गेला. यामुळे अनेक कर्मचारी आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत.
त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना त्वरित जुनी पेन्शन योजना लागू करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी विविध कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी व्यक्तकेले.महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटना, जुनी संघटना, ग्रामसेवक युनियन, लेखा संघटना, परिचर संघटन संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, शिक्षक संघ, शिक्षक पदवीधर संघटना, केंद्रप्रमुख संघटना, शिक्षक भारती संघ अधिकारी (सांख्यिकी, पंचायत) संघटना, वाहनचालक पशुचिकित्सा व्यवसाय संघटना, कास्ट्राइब संघटनासंघटना सहभागी झाल्या होत्या.