गुजरातच्या सरकारी शाळेतील घटना : चौकशीचे आदेश
पालनपूर : अमेरिकेत स्थायिक झाल्याने गुजरात मधील एक शिक्षिका जवळपास आठ वर्षे नोकरीवर गैरहजर राहिली; मात्र या काळात त्यांचा पगार नियमित सुरू होता. ही घटना गुजरातच्या एका सरकारी शाळेतील असून, राज्य सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने दिली.
‘शिक्षिका भावना पटेल वर्षातून केवळ एक महिना नोकरीवर हजर राहतात. मात्र, पगार पूर्ण घेतात; तसेच अमेरिकेत राहत असल्याचे कारण देऊन अनधिकृत रजेवरही जात आहेत,’ असा आरोप बनासकांठा जिल्ह्यातील पंचागावातील प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका पारुल मेहता यांनी केला.
त्यांनी केलेल्या आरोपांनंतर गुजरातचे शिक्षणमंत्री कुबेर दिंडोर यांनी चौकशीचे आदेश दिले असून, जिल्हा अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. शिक्षिका दोषी आढळल्यास त्यांना शिक्षा होईल; तसेच दिलेला पगारही वसूल करण्यात येईल,’ असे दिंडोर यांनी सांगितले.
जानेवारी महिन्यापासून या शिक्षिकेला वेतन मिळालेले नसल्याची माहिती पुढे येत आहे. भावना पटेल २०१६ मध्ये अमेरिकेत स्थायिक झाल्या. मात्र, नोकरी कायम राहावी, यासाठी त्या वर्षातून एकदा महिनाभर येऊन शाळेत शिकवतात. त्यांच्या दीर्घ गैरहजेरीमुळे मुलांना त्रास होत आहे.
त्यांनी राजीनामा द्यावा किंवा पूर्ण वेळ रुजू व्हावे. असे मुख्याध्यापक पारुल मेहता यांनी सांगितले. ‘बनासकांठा जिल्ह्यातील दांता तालुक्यातील ११ शिक्षकांपैकी या एक शिक्षिका आहेत. अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, त्या नियमित अंतराने सुट्टी घेतात.
मात्र, त्यांना जानेवारीपासून एक रुपयाही दिला नसल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. परदेशात राहूनही इतर कोणतेही फायदे मिळवण्यात शिक्षिका दोषी आढळल्यास कारवाई करू,’ अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी दिली.