डॉ . विनोद शहा, मीना शहा यांचा सत्कार
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुण्याईच्या संचितावर अनेक योनीं नंतर मनुष्य जन्म प्राप्त होत असतो. तो मनुष्य जन्म आपण इतर मनुष्य जातीच्या सर्वांगिण उत्थानासाठी उपयोगात आणणे हीच खरी जनसेवा असून मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे मत पद्मश्री प. पु. आचार्य चंदनाजी यांनी व्यक्त केले.
जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून गेली 35 वर्षे अविरत आणि विनाखंड सुरू असलेल्या मानवसेवे बद्दल पद्मश्री प. पु. आचार्य चंदनाजी यांच्या हस्ते जनसेवा फौंडेशननचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शहा आणि जनसेवा फौंडेशनच्या सचिव मीना विनोद शहा यांचा विशेष सत्कार करण्यात आला, त्यावेळी पद्मश्री प. पु. आचार्य चंदनाजी बोलत होत्या.
यावेळी जनसेवा फौंडेशन संचालित कात्रज येथील श्री बाहरी मल्होत्रा निराधार पुनर्वसन केंद्र आणि हिरा कांचन सभागृहाची पद्मश्री प. पु. आचार्य चंदनाजी यांनी पाहणी केली. यावेळी प्रसिध्द उद्योगपती राजेश शहा, प्रवीण मसाले उद्योग समुहाचे राजकुमार चौरडिया, प्रा. जे. पी. देसाई, उद्योगपती राजेंद्र कोठारी, हास्य कल्बचे विठ्ठल काटे, अश्विनी मल्होत्रा, नितीन कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जनसेवा फौंडेशन संचलित निराधार आश्रमात लहान पणापासून राहिलेली आणि आता परिचारीका म्हणून स्वतःच्या पायावर उभी राहिलेल्या कोमल गायकवाड यांनी त्यांचा जनसेवा फौंडेशन सोबतचा रोमांचकारी आणि आव्हानात्मक प्रवास कथन केला.
यावेळी बोलताना पद्मश्री प. पु. आचार्य चंदनाजी म्हणाल्या की, फार कमी लोकांना संसारिक व्याप सांभाळून जनसेवा करण्याची संधी मिळते. ती संधी डॉ. विनोद शहा आणि मीना शहा यांना मिळाली असून या दोघांनी या कार्याच्या माध्यमातून अनेक उपेक्षितांच्या आयुष्यात प्रकाश पेरण्याचे काम केले आहे.
यावेळी शहा दाम्पत्याच्या लग्नास 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पद्मश्री प. पु. आचार्य चंदनाजी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी जनसेवा फौंडेशनच्या अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. डॉ. विनोद शहा यांची कन्या केतकी देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.
पद्मश्री प. पु. आचार्य चंदनाजी यांनी प्रारंभी भिलारवाडी कात्रज येथील जनसेवा फौंडेशन संचालित श्री बाहरी मल्होत्रा निराधार पुनर्वसन केंद्र आणि हिरा कांचन सभागृहास भेट दिली. जनसेवा फौंडेशनचे विश्वस्त वर्धमान जैन यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रसिद्ध उद्योगपती राजेश शहा यांनी आभार मानले.