महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या मिळकतकर विभागाचे संगणकीकरणाच्या नावाखाली खासगीकरण करण्याचा प्रयत्न पुणे महापालिका प्रशासनानेघेतला आहे, कि काय? अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून मिळकतकर विभागात काम सुरू आहे. पालिकेच्या विविध विभागांमध्ये काम मिळविणाऱ्या या कंपनीवर महापालिकेची मेहेरनजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे महापालिकेने मिळकत करासाठी २००८ मध्ये संगणक प्रणाली विकसित केली आहे. त्यात काळानुरूप अनेकदा सुधारणा करण्यात आल्या आहेत. देशातील सर्वाधिक चांगली करसंकलन संकलन यंत्रणा म्हणून केंद्र सरकारने पुणे महापालिकेचा गौरव गेल्यावर्षी केला होता.
महापालिकेच्या मिळकतकर विभागाची संगणक यंत्रणा विकसित करण्यासाठी एक खासगी बँक सीएसआरचा निधी देणार असल्याचे कळते. संबंधित बँकेनेच ही कंपनी नेमली असून त्यानुसार, हे काम केले जाणार आहे.
या कंपनीला कोणताही कार्यादेश दिलेला नाही; मात्र त्यांना संगणक प्रणालीची माहिती हवी असल्याने त्यांचे कर्मचारी काम महापालिकेत काम करत आहेत; मात्र त्याचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. असे स्पष्ट उत्तर महापालिकाचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी दिले आहे.
दुसरीकडे बड्या बँकेने महापालिकेला ‘सीएसआर’चे आमिष दाखवीत नवीन संगणक प्रणाली विकसित करण्यास सुचविले आहे. संगणक प्रणाली विकसित झाल्यानंतर त्याचे कोणतेही प्रशिक्षण महापालिका कर्मचाऱ्यांना दिले जाणार नाही.
याउलट ही यंत्रणा नवीन असल्याने देखभाल-दुरुस्तीचा कालावधी पुढे करत करसंकलनाचे सर्व कामकाज या कंपनीच्या हातीदिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन संगणक प्रणाली कंपनीच चालविणार असून करआकारणीपासून, कराच्या रचनेत बदल, दंड आकारणी, अर्जानुसार दंड कमी करणे, कर लावणे हे सर्व काम खासगी कंपनीच्याहातात जाणार आहे. असी चर्चा सुरु आहे. महापालिकेने या बाबत सविस्तर निवेदन करणे गरजेचे आहे. अशी नागरिकांची अपेक्षा आहे.