केंद्राची मंजुरी : २ हजार ९५४ कोटीं रुपयांचा खर्च
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : स्वारगेट ला मेट्रोने जायचे कात्रज करांचे स्वप्न आता पाच वर्षात प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाला अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव केंद्रसरकारकडे मान्यतेसाठी प्रलंबित होता.५.४६ किलोमीटरचे हे अंतर असून,त्यासाठी २ हजार ९५४ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. सन २०२९ पर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत आहे. आता कात्रज ते वारजे मार्गेवरून हिंजवडी अशीही मेट्रो सुरु करावी. अशी मागणी होऊ लागली आहे. कारण सध्या या मार्गावर खूपच गर्दी होत असते.
कात्रजहून हिंजवडी ,बालेवाडी कडे जाणारी मेट्रो सुरु केल्यास तिकडे कामासाठी जाणाऱ्या हजारो कर्मचार्यांना दिलासा मिळणार आहे. कात्रज ते स्वारगेट या मार्गावर होणारी वाहतूकीची कोंडी लक्षात घेता स्वारगेट पर्यंतचा भुयारी मार्ग तिथून पुढे तसाच कात्रजपर्यंत न्यावा अशी मागणी होत होती. महामेट्रोने तसा प्रस्ताव तयार करून ते राज्य सरकारकडे पाठविला होता.
त्यांनीही मंजुरी देत ते केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी दिला होता. आता त्याला मंजुरी मिळाल्याने या मार्गातील सर्व प्रशासकीय तसेच तांत्रिक अडथळे पूर्ण झाले आहेत. महामेट्रोकडून ही माहिती देण्यात आली. पिपरी-चिंचवड वरून आता मेट्रोने थेट कात्रजला जाणे शक्य होणार आहे.
मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजी नगर, तसेच कात्रज या परिसरात ही स्थानके असतील. त्यामुळे स्वारगेट ते कात्रज या मार्गावरील ही सर्व ठिकाणे आता मेट्रोने जोडली जातील. प्रकल्पाचा खर्च केंद्र सरकार, राज्य सरकार व वित्तीय संस्थांकडून उभा केला जाणार आहे.
यामध्ये सुरुवातीला महापालिकेचा वाटा गृहित धरण्यात आला होता, मात्र आता या नव्या वित्तीय रचनेमुळे महापालिकेला दिलासा मिळाला आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट व आता स्वारगेट ते कात्रज असा थेट शिवाजीनगरपासून कात्रजपर्यंत सलग भुयारी मार्ग यातून तयार होणार आहे.
केंद्र सरकारचे पुण्याकडे लक्ष आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता लगेचच स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मेट्रो मार्गाला मंजुरी दिली आहे.अशी प्रतिक्रिया पुण्याचे खासदार केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री, मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे.
या प्रस्तावित मार्गाला मंजुरी मिळाल्यामुळे आता सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होईल.या कामातील सर्व अडथळे आता केंद्र सरकारच्या मंजुरीमुळे दूर झाले आहेत.असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केली आहे.