निगडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या एका तरुणाची १२ लाख ७१ हजार ५७४ रुपयांची फसवणूक केली. ही घटना १३ ते १६ मार्च या कालावधीत यमुनानगर, निगडी येथे ऑनलाइन पद्धतीने घडली.
याबाबत ३८ वर्षीय तरुणाने निगडी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार ११ अज्ञात बँक खातेधारक, मोबाइलधारक व ग्रुप अॅडमिन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादींना फोन केला. फिर्यादींना नोकरीची गरज आहे, याची खात्री करून टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. फिर्यादींना १० टक्के नफा कमवून देण्याचे आमिष दाखवले.
फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांत १२ लाख ७१ हजार ५७४ रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादींची मूळ रक्कम, तसेच नफा याची रक्कम परत न देता फसवणूक केली. या प्रकरणी तपास सुरू आहे.