वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, सय्यद नगरची घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यात आता गुंडांनी पोलीसावर हल्ला करण्याची मजल गाठली आहे. रस्त्यावर सुरू असलेले भांडण सोडवायला गेलेल्या सहायक पोलिस निरीक्षकावरच कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सय्यदनगर परिसरात रविवारी दुपारी घडली. यामध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून, मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. दोघेही हल्लेखोर गुन्हेगार पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.
रत्नदीप गायकवाड असे जखमीसहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. ते वानवडी पोलिस ठाण्यांतर्गत महंमदवाडी पोलिस चौकीचे प्रभारी अधिकारी म्हणून नेमणुकीस आहेत. ही घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास सय्यदनगर रेल्वे गेटजवळ न्यू रॉयल ऑटो गॅरेजशेजारी घडली.
या प्रकरणी वानवडी पोलिस स्टेशनमध्ये सराईत आरोपी व त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निहालसिंग मन्नूसिंग टाक आणि राहुलसिंग या दोन्ही आरोपींवर शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये डझनभर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये शारीरिक हल्ल्याचे गुन्हे, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, दरोडा अशा गुन्ह्यांचा सामावेश आहे.
निहालसिंग मन्नूसिंग टाक (वय १८, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर) आणि राहुलसिंग ऊर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (वय १९, रा. हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सय्यदनगर परिसरात ही घटना घडली आहे.
रेल्वे गेटजवळ न्यू रॉयल ऑटो गरजच्या समोर निहालसिंग मन्नूसिंग टाक, त्याचा साथीदार राहुलसिंग आणि एका दुचाकीस्वारात वाद सुरू होता. निहालसिंग याच्या हातात कोयता होता. त्यावेळी सहायक निरीक्षक रत्नदीप गायकवाड तेथून पेट्रोलिंग करीत होते.
त्यांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. निहालसिंग याच्या हातातील कोयता घेण्यासाठी ते पुढे गेले, तेव्हा दोघांनी त्यांच्यावरच हल्ला केला. निहालसिंगने कोयता गायकवाड यांच्या डोक्यावर फेकून मारला. कोयता डोक्याला लागल्याने ते गंभीर जखमी झाले, यानंतर निहालसिंग व राहुलसिंग भोड सय्यदनगरच्या दिशेने पळून गेले.
नागरिकांनी गायकवाड यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. गेल्या आठवड्यात कात्रज येथे वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला एका वाहनचालकाने मारहाण केल्याची घटना घडली. त्या पूर्वी फरासखाना वाहतूक विभागाच्या सहायक निरीक्षक शैलजा जानकर यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटविण्याचा प्रयत्न झाला होता. या घटना पाहता पोलिसांच्या वर्दीचा धाक, भीती उरली नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकाऱ्यावरील हल्ल्यामुळे राज्यात पोलिसही सुरक्षित नसल्याचे चित्र आहे.