६५ गुन्हे दाखल, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूरच्या ग्रामीण भागात अवैध धंद्यावर धडक कारवाई सुरू केली आहे. ६५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे ६,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रण आणि अवैध धंद्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून काल दि. २४ ऑगस्ट रोजी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यांकडून अवैध दारू आणि जुगार यावर केसेस करण्यासाठी पथक नेमण्यात आले होते. या पथकांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या ५५ लोकांचा शोध घेऊन ५५ गुन्हे दाखल केले आहेत.
त्यामध्ये ३८०० लिटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ मिश्रित रसायन आणि ५५० लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्या १० लोकांवर केसेस करण्यात आलेल्या असून एकूण ४,०२,५०६/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली २ पथकांनी मुळेगाव तांडा, सोलापूर येथील अवैध हातभट्टीवर छापे घालून एकूण १,४१,३००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.