वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त बहुमोल मार्गदर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : आपल्याकडील चांगल्या साधनांचा उपयोग करून पुण्य मिळवा, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेत त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही मार्गदर्शन केले.
पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, जे पुण्यवंत असतात त्यांच्याकडे साधने असतात, ते त्या साधनांचा उपयोग करून पुन्हा पुन्हा पुण्य प्राप्त करतात. जर तुम्ही पुण्यवंत असाल, तर तुमच्याकडे चांगले शरीर, चांगले स्वास्थ्य, धन, ज्ञानाची व्यवस्था अशी साधने असतात.
हे सगळे पुण्यामुळे मिळते. जे स्वतःकडे पुण्य असून पुन्हा पुण्य करतात, त्यांना आपण ‘पुण्यानुबंधी पुण्यम्’ म्हणतो. पण जर चांगले शरीर, स्वास्थ्य, धन, ज्ञान या साधनांचा चांगुलपणासाठी उपयोग केला नाही, तर तेच निगेटिव्ह होते आणि ‘पुण्यानुबंधी पाप’ होते. म्हणजे आपण अंधारातून जन्म घेतला आणि पुढेही आपल्यासमोर अंधारच मांडून ठेवला.
‘पापानुबंधी पापम्’ म्हणजे स्वतःकडे काहीही नसणं. याला शबरीचे उदाहरण देता येईल. तिच्याकडे काहीच नव्हते, तरी पूर्ण तन्मयतेने तिने रामाला बोर खाऊ घातले. पुण्य नऊ प्रकारचे आहेत. आपल्या सगळ्यात जवळचे पुण्य आहे ‘मनपुण्य’. मनाचे चांगले विचार, मनाचा आनंद हेच मनपुण्य आहे.
हेच पुरुषार्थ आहे. पण जर मन निगेटिव्ह असेल, तर ते मनपुण्य आपल्याला करता येणार नाही, आणि आपल्याकडून होणारदेखील नाही. मानलं तर दगडातसुद्धा देव आहे, आणि न मानलं तर काहीच नाही. कधी विचार केलाय का की जगात एवढी विषमता का आहे? याचं कारण आपल्या प्रत्येक कर्माचा इफेक्ट आहे.
कोणतीही गोष्ट जीवनात उगाचच घडत नाही, कोणतीही वस्तू जगात नष्ट होत नाही, तसेच आपले विचारही नष्ट होत नसतात, हे कायम लक्षात ठेवा. उच्च गोत्रात जन्म घेतलेल्या व्यक्तींसाठी रस्ता सोपा असतो, मात्र नीच गोत्रात जन्म घेणाऱ्यांसाठी रस्ता कठीण असतो.
दुसऱ्याची निंदा आणि स्वतःची प्रशंसा करणं, तसेच आपल्या गुणांची प्रशंसा करणे आणि दुसऱ्यांच्या गुणांची निंदा करणे हेच नीच गोत्र आहे. आपल्या प्रत्येक कर्माचा इफेक्ट असतो. आज सगळ्यात मोठी समस्या ह्यूमन रिलेशनशिपची आहे.
आधी समूहाची भावना होती. जसजसा आपण विकास आणि प्रगती करत गेलो, तसतसा आपला पेशंस कमी होत गेला, सहनशीलता कमी झाली. आज मुलांबरोबर मुलीदेखील तितक्याच ताकदीने कमवितात.
त्यामुळे “मी हे का करू?” असा सवाल त्या करतात आणि तिथूनच समस्या निर्माण होतात. जितकं शिक्षण महत्त्वाचं आहे, तितकेच संस्कारही महत्त्वाचे आहेत. ते नेहमी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आचरण करा, असे मत पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी व्यक्त केले.