बिबवेवाडी जैन स्थानकात केले मार्गदर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : आयुष्यातील सुख आणि दु:ख दोन्ही आपल्या हातात आहे. समस्यांवर उपाय दुःखातही शोधायला शिका. ही सुख-दु:खे व्यक्तीसोबत येत राहतात. जे गमावले त्यावर रडू नका आणि जे मिळवले त्यात समाधानी रहा. तरच जीवन आनंदी होईल. असा उपदेश प. पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा. यांनी केला.
बिबवेवाडी जैनस्थानकात प्रवचनात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. प.पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा. म्हणाल्या मनुष्य जन्म घेतो. त्यावेळी मागील जन्माचे संचित कर्म (जमा केलेले / साठलेले ) सोबत घेऊन येतो. यालाच प्रारब्ध असे म्हणतात. भाग्य इथपर्यंत साथ देते.
मागील कर्म आणि चालू कर्म जेव्हा उदयाला येतात त्यावेळी आपल्याला पुरुषार्थ करणे आवश्यक आहे. बिना पुरुषार्थ केल्या आपण जीवन जगूच शकत नाही. जेवणाचे ताठ वाढलेले आहे त्यातील अन्न खाण्याचा पुरुषार्थ केला तरच ते अन्न आपल्या पोटामध्ये जाऊन आपली भूक शमवणार आहे.
तहान लागल्यावर समोर भरून ठेवलेले पाणी पिण्याचा पुरुषार्थ केला तरच आपली तहान भागू शकते. प्रत्येक दुःखाचे मूळ कारण आहे आपले प्रारब्ध (संचित कर्म ). प्रारब्ध आपत्ती घेऊन येतात आपल्याला पुरुषार्थ करावा लागतो. परमात्म्याचे कर्म तत्व सांगते की कर्माप्रमाणे भोग भोगावे लागतात.
जसे डॉक्टर आणि वैद्य हे रोग बरे करण्यासाठी सहयोगी बनतात त्याचप्रमाणे औषध हे मित्र बनते. जसे अन्न शरीराला ताकद पूर्ण होण्यास मदत करते. डोळ्यांचा चष्मा दिसण्यास मदत करतो. त्याचप्रमाणे कर्म कमी (हलके) करण्यासाठी साधना, उपासना आणि तपश्चर्या प्रभूची जीनवानी मदत करते.
म्हणून या चातुर्मासात आपल्या आत्म्याला या दुःखांपासून मुक्त करा आणि स्वतःला भगवंताच्या भक्तीमध्ये समर्पित करा. तूप गरम केल्याने दुर्गंधी जाते, पीठ गरम केल्याने रोटी बनते, दूध गरम करून मावा बनवतात, सोने गरम केल्याने सोने उजळते. तसेच तपश्चर्येच्या अग्नीत आत्म्याला गरम केल्याने कर्मांचा नाश होतो.
जोपर्यंत मनुष्य तपश्चर्येच्या अग्नीत जळत नाही तोपर्यंत त्याचे कर्म नष्ट होत नाही. तपश्चर्या करणे हे शूरांचे काम आहे. वासना सोडून उपासनेला आलिंगन द्या. परिग्रह सोडून अपरिग्रहाचा अवलंब करा. जैन धर्माच्या प्रत्येक स्तोत्रात आणि मंत्रात एवढी शक्ती आहे की ती जर माणसाने आपल्या जीवनात आत्मसात केली तर जीवनातील प्रत्येक समस्या दूर होऊ शकतात.
