बार्शी तालुका पोलिसांची मोठी कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर तसेच सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये बार्शी पोलिसांनी आणखी एक महत्त्वपूर्ण कारवाई केली. दुय्यम निरीक्षक, कुर्डूवाडी यांच्या उपस्थितीत बार्शी तालुका पोलीस ठाण्याकडील एकूण 43 गुन्ह्यांतील 2 लाख 72 हजार 331 रुपयांचा मुद्देमाल पंचांच्या समक्ष नष्ट करण्यात आला.
या कारवाईत 25 हजार रुपयांवरील 2 प्रॉव्हिजन गुन्ह्यांतील मुद्देमाल तसेच 25 हजार रुपयांखालील 41 गुन्ह्यांतील मुद्देमालाचा समावेश होता. मुद्देमाल नाशाची संपूर्ण प्रक्रिया पंचांच्या उपस्थितीत पार पडली असून, त्या वेळी फोटो आणि व्हिडिओग्राफीद्वारे अधिकृत नोंद ठेवण्यात आली.
ही कारवाई बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सपोनि दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसणे, पोहेकॉ पांडुरंग देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल युवराज गायकवाड, सिद्धेश्वर लोंढे आणि गोविंद बचुटे यांच्या उपस्थितीत पार पडली.
विशेष म्हणजे, याच कार्यक्षम टीमने काही काळापूर्वी बार्शी तालुक्यातील सर्वात मोठा गांजाचा साठा पकडत मोठी कारवाई केली होती. या सातत्यपूर्ण मोहिमा आणि कारवायांमुळे बार्शी तालुका पोलिसांकडून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवले जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
