मुंढवा पोलिसांनी जप्त केली साडेचार लाखांची स्कोडा कार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गॅरेजमधील चावी घेऊन बाहेर पार्क केलेली स्कोडा कार चोरून नेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या कडून स्कोडा कार जप्त करण्यात आली आहे. त्यांना ती विकून येणाऱ्या पैशातून मजा करायची होती, परंतु त्याआधीच ते पोलिसांच्या हाती लागले.
संदीप नंदलाल जयस्वाल (रा. कलाशंकर नगर, बी. टी. कवडे रोड, घोरपडी) यांनी आपली स्कोडा कार गॅरेजमध्ये पार्क केली होती आणि चावी गॅरेजमध्ये ठेवली होती. ७ व ८ ऑक्टोबरच्या रात्री चोरट्यांनी गॅरेजची कुलपे तोडून आत प्रवेश केला. तेथून चावी घेऊन त्यांनी स्कोडा कार चोरून नेली.
या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार शिवाजी जाधव यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी तांत्रिक तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि बातमीदाराकडून पोलिस अंमलदार योगेश राऊत यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ११ ऑक्टोबरला दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी लपवून ठेवलेली स्कोडा कार पोलिसांनी जप्त केली आहे. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक माया देवरे, पोलिस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर, पोलिस उपनिरीक्षक युवराज पोमण, पोलिस हवालदार शिवाजी जाधव, राहुल मोरे, योगेश गायकवाड, पोलिस अंमलदार योगेश राऊत, रुपेश तोडकर, अक्षय धुमाळ आणि स्वप्नील रासकर यांनी केली.
