२१ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त : ५ गुन्हे उघडकीस
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : चोरलेल्या मोटारीतून घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून मोटारीसह दागिने असा एकूण २१ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरट्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर त्याने पुन्हा घरफोडीचे गुन्हे करण्यास सुरुवात केल्याची माहिती तपासात मिळाली आहे.
बिरजू राजपूतसिंग दुधानी (वय ४०, रा. रामटेकडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध येरवडा, चिखली, भोसरी एमआयडीसी आणि संत तुकारामनगर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेचे पथक रविवारी (१२ ऑक्टोबर) खराडी परिसरात गस्त घालत होते.
त्यावेळी दुधानी मोटारीतून निघाला असून, त्याने घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती पोलीस अंमलदार नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखेले यांना मिळाली. पोलिस पथकाने त्याला सापळा लावून पकडले. दुधानी वापरत असलेल्या मोटारीवर वाहन क्रमांकाची पाटी नव्हती. पोलिसांनी त्याच्याकडून ५ गुन्हे उघडकीस आणले असून, दागिने आणि मोटार असा २१ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलिस निरीक्षक राकेश कदम, मदन कांबळे, पोलिस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, नीलेश साळवे, नेहा तापकीर, ऋषिकेश व्यवहारे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे आणि सोनाली नरवडे यांनी केली.
