२.६९ कोटी रुपयांची भिशी चालवून फरार झालेले दांपत्य आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर : भिशीच्या माध्यमातून तब्बल २ कोटी ६९ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या दांपत्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंध्रप्रदेश राज्यातील लक्खावरम, मल्लिकीपूरम मंडल येथून अटक केली आहे.
फिर्यादी शिवाजी लक्ष्मण आवार (रा. साईबाबा चौक, सोलापूर) व इतर ठेवीदारांनी श्री ओम साई फायनान्सचे मालक रमेश अंबादास चिप्पा आणि त्यांची पत्नी सुजाता रमेश चिप्पा यांच्याकडे गुंतवणूक केली होती.
दि. ०१ नोव्हेंबर २०२० ते ३० एप्रिल २०२४ या काळात आरोपी दांपत्याने विश्वास संपादन करून भिशी चालवली आणि ठेवीदारांना जास्तीत जास्त व्याजाचे आमिष दाखवून १३१ ठेवीदारांकडून २.६९ कोटी रुपये स्वीकारले. मात्र, या रकमेचा किंवा व्याजाचा परतावा न देता दोघे पळून गेले.
या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ३३४/२०२४ कलम ४०६, ४२०, ३४ भादंवि आणि कलम ३ एम.पी.आय.डी. अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पुढे आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांच्याकडे वर्ग करण्यात आला.
सहा. पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा ठावठिकाणा शोधला. आरोपी दांपत्य आंध्रप्रदेशात लपून राहत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मा. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार तपास पथकाने आंध्रप्रदेश पोलिसांच्या मदतीने दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी दोघांना अटक केली.
स्थानिक न्यायालयाकडून ट्रांझिट वॉरंट मिळवून आरोपींना सोलापूर येथील विशेष न्यायाधीश (एम.पी.आय.डी. कोर्ट) मा. राणे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी रिमांड दिली असून तपास सुरू आहे.
ही कारवाई सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहा. आयुक्त राजन माने, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जीवन निरगुडे, सपोफौ अंबादास चव्हाण, पोहेकॉ पिंटू जाधव, महिला पोकॉ रेश्मा वाकडे, पोकॉ तीसिफखान पठाण, महिला पोकॉ रुपाली काकरे तसेच सायबर पोलिस ठाण्यातील पोहेकॉ मच्छिद्र राठोड व प्रकाश गायकवाड यांनी संयुक्तपणे केली.
