समर्थ पोलीसांची यशस्वी कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : केरळहून पुण्यात आलेल्या प्रवाशाची रिक्षात विसरलेली बॅग परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज अहमद के.पी. (वय 48 वर्ष, रा. कोझिकोड, केरळ) हे सकाळी 10:30 वाजता पुणे स्टेशन येथे आले होते. ते आपल्या मित्र उमर करीम फारुख (वय 42 वर्ष, रा. रास्ता पेठ, पुणे) यांना भेटण्यासाठी रिक्षात बसले होते आणि 10:45 वाजता रास्ता पेठ येथे आले. रिक्षातून उतरल्यावर, काही वेळानंतर त्यांनी त्यांच्या लक्षात घेतले की, बॅग रिक्षामध्ये विसरली आहे.
त्यानंतर, ते तक्रार देण्यासाठी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी तातडीने हालचाल करीत तपास पथकाचे पोलीस शिपाई घोरपडे आणि हवालदार इमरान शेख यांना सूचना दिल्या. तपास पथकाने 6 ते 7 सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित रिक्षाचा क्रमांक एम. एच. 12/ जे. एस. 7883 प्राप्त केला.
त्यावरून, रिक्षा चालकाचे नाव अरुण पवार (वय 50 वर्ष, रा. मानस लेक सिटी ग्रँड टॉवर) असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधून रियाज अहमद यांची रिक्षामध्ये विसरलेली बॅग परत मिळवून दिली. बॅगमध्ये असलेले कपडे, मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे सर्व सुस्थितीत मिळाल्याने, रियाज अहमद यांनी पुणे पोलिसांचे आभार मानले आहेत.

















