मोफत शिबिरात १५०० जणांची नेत्र तपासणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घेणे तसेच डॉक्टरांनी निदानानुसार दिलेला चष्मा नेहमी वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे “नीट असेल दृष्टी तरच पाहू सृष्टी” असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका शोभा धारीवाल यांनी केले.
आर. एम. डी. फाऊंडेशनतर्फे ढोले पाटील वसाहत, गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क आणि बर्निंग घाट बंड गार्डन येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी व चष्मा वितरण शिबिराच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. त्यापुढे म्हणाल्य अनेकांना दूरचे दिसत नाही, काहींना जवळचे दिसत नाही, तर काहींना धूसर दिसू लागते.
अनेक लोक डोळ्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांची काळजी घेत नाहीत. काहींना डोळे आजारी पडतात याची जाणीवच नसते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्मार्टफोन, कॉम्प्युटरचा अतिवापर, टीव्ही अधिक वेळ पाहणे, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, तणाव, जागरण यांमुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडत चालले आहे.
या तिन्ही ठिकाणी मिळून १५०० पेक्षा अधिक स्त्री-पुरुष, वृद्ध तसेच लहान मुलांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तर १२५० लोकांनी मोफत चष्म्याचा लाभ घेतला. या प्रसंगी बंड गार्डन गणेश मित्र मंडळ, भीम शक्ती तरुण मंडळ, पंचशील फाऊंडेशन ताडीवाला इत्यादी संस्थांचे अध्यक्ष व कार्यकर्ते, तसेच वसाहतीतील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

















