महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून १ एप्रिल २०२४ ते २३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ३६,५३८ दाखले वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली.
महापालिकेच्या वतीने नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रमाणपत्रे, परवाने आदी सेवा प्रदान केल्या जात आहेत. नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सेवेचा अर्ज ऑनलाईन भरण्यात येतो आणि नागरिक आवश्यक त्या सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय प्राप्त करू शकतात.
७/१२ उतारा, रहिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र अशी अनेक उपयुक्त कागदपत्रे या माध्यमातून नागरिक प्राप्त करत आहेत. यासाठी लांबच लांब रांगा लावण्याची गरज नाही, तसेच प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कार्यालयात असंख्य फेर्या मारण्याची आवश्यकता भासत नसल्याने वेळेचीही बचत होते.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत महापालिकेच्या वतीने एकूण ९४ नागरी सुविधा केंद्रे उभारण्यात आली असून, दाखले काढण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक या केंद्रांवर जाऊन आवश्यक दाखले काढत आहेत.
